युएई अन् सौदीनंतर मित्रदेशासमोर मदतीसाठी धाव
वृत्तसंस्था/ बीजिंग
पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल आसिम मुनीर हे चार दिवसांच्या दौऱयानिमित्त चीनमध्ये पोहोचले आहेत. नोव्हेंबरमध्ये सैन्यप्रमुखपद स्वीकारल्यावर मुनीर यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. यापूर्वी मुनीर यांनी संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाचा दौरा केला आहे.
चीनच्या अधिकाऱयांसोबत दोन्ही देशांचे सैन्यसंबंध अधिक मजबूत करण्यावर मुनीर हे चर्चा करणार असल्याचे पाकिस्तानच्या सैन्याकडून सांगण्यात आले आहे. मुनीर यांच्या दौऱयादरम्यान चीन पाकिस्तानला कर्जांच्या काही अटींप्रकरणी दिलासा देण्याची शक्यता आहे. आसिम मुनीर यांचा हा दौरा 4 दिवसांचा आहे. सर्वसाधारपणे अशाप्रकारचे दौरे इतक्या मोठय़ा कालावधीचे नसतात. पाकिस्तानवर चीनचे मोठे कर्ज आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 1.2 अब्ज डॉलर्सचा हप्ता जारी करण्यासंबंधी पाकिस्तानला अद्याप कुठलेच आश्वासन दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर मुनीर हे चीनकडून आर्थिक मदत मिळविण्याचा प्रयत्न करू शकतात.
रशियाने पाकिस्तानला स्वस्त दरात कच्चे तेल उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आहे. रशियाच्या होकारामागे चीनची भूमिका असल्याचे मानले जाते. यापूर्वी भारताच्या दबावामुळे रशिया कुठल्याही स्थितीत पाकिस्तानला स्वस्त दरात कच्चे तेल किंवा धान्य देण्यास तयार नव्हता. रशियाने भारताशी चर्चा केल्यावरच पाकिस्तानला कच्चे तेल पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.
यातही चीनलाच फायदा
रशियाने पाकिस्तानला कच्चे तेल पुरविण्याचा निर्णय घेतला असला तरीही यात चीनचाच फायदा होणार आहे. रशियाच्या हेवी क्रूड ऑइलचे शुद्धीकरण करून ते वापरयोग्य करण्यासारखी रिफायनरी पाकिस्तानकडे नाही. भारत आणि चीनकडे अशाप्रकारच्या अनेक रिफायनरीज आहेत. पाकिस्तानने रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्यास ते प्रथम पाकिस्तान अन् मग चीनमध्ये पोहोचणार आहे. तेथे रिफाइन करून इंधन पाकिस्तानात आणले जाणार आहे. म्हणजेच पाकिस्तानला रिफाइनिंगचा खर्च उचलावा लागेल तसेच वाहतुकीसाठी येणारा दुप्पट खर्चही करावा लागणार आहे.









