शाहबाज यांना गिफ्ट केलेले चित्र चीनच्या सैन्याभ्यासाचे
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानची निर्मितीच असत्याच्या पायावर झाली होती आणि पाकिस्तान स्वत:च्या इतिहासाबद्दल नेहमीच खोटं बोलत असतो. तेथील वरिष्ठ अधिकारी देखील अत्यंत बेदरकारपणे खोटं बोलत असतात. याचे उदाहरण पुन्हा पहायला मिळाले आहे. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांनी अलिकडेच डिनरचे आयोजन केले होते. यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफसह अनेक मोठे नेते सहभागी झाले. यादरम्यान मुनीर यांनी शाहबाज यांना गिफ्ट केलेले पेंटिंग पाकिस्तानच्या थट्टेचा विषय ठरले आहे. मुनीर यांनी शाहबाज यांना गिफ्ट केलेले चित्र हे भारतावरील हल्ल्याचे नव्हे तर चीनच्या सैन्याभ्यासाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोशल मीडियावर हे पेंटिंग व्हायरल होत असून लोक पाकिस्तानी सैन्याच्या खोटारडेपणाला लक्ष्य करत आहेत. पाकिस्तानकडे सर्वकाही चीनचे आहे, पाकिस्तानी सैन्याने पेंटिंगमध्ये देखील चिनी सैन्याच्या सरावाचा वापर केल्याची उपरोधिक टिप्पणी करण्यात आली आहे. या पेंटिंगद्वारे मुनीर यांनी भारत विरोधातील पाकिस्तानी सैन्याच्या अभियानाला दाखविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाकिस्तानचा खोटारडेपणा आता उघड झाला आहे. तसेच पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली अहे.
हे पेंटिंग भारताच्या विरोधात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन बुनयानचे असल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याने केला होता. परंतु हे पेंटिंग 2019 मधील चिनी सैन्याभ्यासाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या चित्राचा शेकडो वेळा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर वापर करण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना चिनी पीएचएल-03 रॉकेट लाँचरचा एक मॉर्फ्ड फोटो गिफ्ट करण्यात आला. हे छायाचित्र गुगलवरून डाउनलोड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात हे चित्र 18 ऑगस्ट 2018 रोजीचे आहे, त्यावेळी चिनी सैन्याने सरावादरम्यान पीएचएल-03 रॉकेट लाँचरद्वारे अनेक रॉकेट्स डागली होती. त्यावेळच्या फोटोचे पेंटिंग तयार करवून घेत पाकिस्तानच्या सैन्यप्रमुखांनी शाहबाज यांना ते गिफ्ट केले होते.









