शिखांवर हल्ल्याचे प्रकरण
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पाकिस्तानमधील शीख समुदायाच्या सदस्यांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यांनंतर भारताने सोमवार, 26 जून राजी नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला पाचारण केले. भारताने या घटनांचा तीव्र निषेध नोंदवला आहे. पाकिस्तानातील पेशावरमध्ये शनिवार, 24 जून रोजी मनमोहन सिंग (35) नावाच्या शीख व्यक्तीची बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यापूर्वीही पाकिस्तानात अशाप्रकारे हल्ले झाले असून संबंधित राजनैतिक अधिकाऱ्याकडे भारताने यासंबंधी मुद्दा उपस्थित केला आहे. एप्रिल ते जून 2023 या कालावधीत पाकिस्तानमध्ये शीखांवर हल्ला होण्याच्या चार घटना घडल्या असून भारताने या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत. त्यानुसार आता शीख समुदायावरील या हिंसक हल्ल्यांची पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे चौकशी करावी आणि तपास अहवाल शेअर करावा, अशी मागणी भारताने केली आहे.









