वृत्तसंस्था /इस्लामाबाद
जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवर भारताने दोन नव्या जलविद्युत प्रकल्पांच्या कार्याला सुरुवात केली आहे. या प्रकल्पांचे नाव किरु अणि क्वार आहे. भारताच्या या जलविद्युत प्रकल्पांवरून पाकिस्तान भडकला आहे. पाकिस्तानने भारतीय प्रकल्पांच्या डिझाइनवर आक्षेप घेत 1960 मध्ये झालेल्या सिंधू कराराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात यापूर्वीच किशनगंगा तसेच रतले जलविद्युत प्रकल्पांच्या डिझाइनवरून न्यायालयीन लढाई सुरू आहे.भारताचे हे नवे प्रकल्प पाकिस्तानच्या दिशेने वाहणाऱ्या नद्यांवर निर्माण केले जात आहेत. पाकिस्तानने अलिकडेच सिंधू जल आयोगाच्या पातळीवर भारतासोबतच्या चर्चेत किरू आणि क्वार जलविद्युत प्रकल्पांच्या डिझाइनवर आक्षेप दर्शविला आहे.
किरू जलविद्युत प्रकल्पाची क्षमता 624 मेगावॅट तर क्वार जलविद्युत प्रकल्पाची क्षमता 540 मेगावॅट इतकी आहे. कराराच्या नियमांच्या अंतर्गत भारताला स्वत:च्या जलविद्युत प्रकल्पांचे डिझाइन पाकिस्तानला उपलब्ध करावे लागते. भारताने काही दिवसांपूर्वी आणखी दोन जलविद्युत प्रकल्पांचे डिझाइन सादर केले आहे, हे प्रकल्प चिनाब नदीवर निर्माण करण्याची भारताची योजना आहे. आम्ही दोन्ही प्रकल्पांच्या डिझाइनवर आम्ही आक्षेप नोंदविले आहेत. पाकिस्तानने वारंवार आक्षेप नोंदवूनही भारत स्वत:च्या प्रकल्पांच्या डिझाइन बदलण्यास तयार नसल्याचा आरोप पाक अधिकाऱ्याने केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या झेलम नदीवरील किशनगंगा प्रकल्पाचे डिझाइन आणि चिनाब नदीवरील रतले प्रकल्पावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे. हा खटला जिंकल्यास भारताला या नद्यांवर भविष्यात कुठलाही प्रकल्प निर्माण करता येणार नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.









