शेवटच्या सामन्यात न्यूझीलंड विजयी, मार्क चॅपमनला दुहेरी मुकुट
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
यजमान पाक आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-2 अशा फरकाने बरोबरीत राहिली. या मालिकेतील येथे सोमवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने पाकचा 4 चेंडू बाकी ठेवून सहा गड्यांनी पराभव केला. या सामन्यात मार्क चॅपमनने नाबाद शतक (104) झळकावून ‘सामनावीर’ आणि ‘मालिकावीर’ असा दुहेरी मुकूट संपादन केला.
या मालिकेमध्ये चौथ्या सामन्याअखेर यजमान पाकिस्तान 2-1 अशा फरकाने आघाडीवर होता. या मालिकेतील चौथा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. शेवटच्या सामन्यातही पाकचा संघ विजयाच्या मार्गावर होता. पाक संघातील मोहमद रिझवानने नाबाद 98 धावांची खेळी केली होती. पाकने न्यूझीलंडला या शेवटच्या सामन्यात विजयासाठी 194 धावांचे आव्हान दिले होते पण मार्क चॅपमनच्या नाबाद शतकाने न्यूझीलंडने आपला विजय नोंदवत ही मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले.
या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकने 20 षटकात 5 बाद 193 धावा जमवल्या. पाकच्या डावामध्ये सलामीच्या रिझवानने 62 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारासह नाबाद 98, कर्णधार बाबर आझमने 18 चेंडूत 3 चौकारासह 19, इफ्तिकार अहमदने 22 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 36, इमाद वासीमने 14 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 31 धावा जमवल्या. मोहमद हॅरीस आणि सईम अयुबला खाते उघडता आले नाही. न्यूझीलंडतर्फे टिकनेर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 33 धावात 3 तर सोधीने 21 धावात एक गडी बाद केला. रिझवान आणि आझम यांनी सलामीच्या गड्यासाठी 5.4 षटकात 51 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पाकने आपले तीन गडी केवळ एका धावेत गमवले. मोहमद रिझवान आणि इफ्तिकार अहमद यांनी चौथ्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी केली. इफ्तिकार अहमद बाद झाल्यानंतर इमाद वासीमने रिझवानला बऱ्यापैकी साथ देताना पाचव्या गड्यासाठी 5.4 षटकात या जोडीने 64 धावा झोपडल्या. पाकच्या डावामध्ये 7 षटकार आणि 18 चौकार नोंदवले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडची 4 षटकात स्थिती 3 बाद 26 अशी केविलवाणी होती. डावातील पहिल्याच चेंडूवर कर्णधार लॅथम शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर शाहीन आफ्रिदीने यंगला 4 धावावर झेलबाद केले. इमाद वासीमने बोवेसचा त्रिफळा उडवला. त्याने 4 चौकारासह 19 धावा केल्या. मिचेल आणि चॅपमन यांनी चौथ्या गड्यासाठी 47 धावांची भर घातली. इमाद वासीमने मिचेलला 15 धावावर झेलबाद केले. 9.5 षटकात न्यूझीलंडने 4 बाद 73 धावा जमवल्या होत्या. मार्क चॅपमन आणि नीशम या जोडीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. या जोडीने आपल्या संघाला 4 चेंडू बाकी ठेवून सहा गड्यांनी विजय मिळवून दिला. चॅपमनने 57 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारासह नाबाद 104 तर नीशमने 25 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 45 धावा झळकवल्या. या मालिकेमध्ये चॅपमनने 34, नाबाद 65, नाबाद 16, नाबाद 71 आणि नाबाद 104 धावा जमवल्या आहेत. चॅपमनचे टी-20 प्रकारातील हे तिसरे शतक आहे. पाकतर्फे शाहीन आफ्रिदी आणि इमाद वासीम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. न्यूझीलंडच्या डावात 6 षटकार आणि 20 चौकार नोंदवले गेले. आता या मालिकेनंतर उभय संघामध्ये पाच सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक : पाक 20 षटकात 5 बाद 193 (रिझवान नाबाद 98, बाबर आझम 19, मोहमद हॅरीस 0, इफ्तिकार अहमद 36, इमाद वासीम 31, अश्रफ नाबाद 1, अवांतर 8, टिकनेर 3-33, सोधी 1-21), न्यूझीलंड 19.2 षटकात 4 बाद 194 (मार्क चॅपमन नाबाद 104, नीशम नाबाद 45, बोवेस 19, यंग 4, मिचेल 15, अवांतर 7, शाहीन आफ्रिदी 2-42, इमाद वासीम 2-21).