वृत्तसंस्था/ लाहोर
येत्या सप्टेंबर महिन्यात पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघामध्ये पहिल्यांदाच मर्यादित षटकांच्या मालिका खेळवल्या जात असून या मालिकेसाठी पाक क्रिकेट मंडळाने सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर मालिका पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच खेळवली जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ पाकमध्ये टी-20 चे तीन सामने तर त्यानंतर तीन वनडे सामने खेळणार आहे. हे सामने 1 ते 14 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचे 27 ऑगस्टला पाकमध्ये आगमन होईल. या दोन्ही मालिकेतील सर्व सामने कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर खेळवले जातील.
दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाच्या पाक दौऱ्याला 1 सप्टेंबरपासून प्रारंभ होईल. उभय संघातील 3 टी-20 सामने 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान होतील. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका 8 ते 14 सप्टेंबर दरम्यान आहे. उभय संघातील होणारे हे सामने आयसीसीच्या 2022-25 च्या महिला चॅम्पियनशिप स्पर्धा अंतर्गत राहतील. आयसीसीच्या महिलांच्या मानांकन यादीत पाकचा संघ सध्या दुसऱ्या स्थानावर असून द. आफ्रिका सहाव्या स्थानावर आहे. पाकची कर्णधार निदा दार तसेच दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुने लुस यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहिले आहे.
27 ऑगस्ट- दक्षिण आफ्रिका संघाचे आगमन
1 सप्टेंबर पहिला टी-20 सामना
3 सप्टंबर दुसरा टी-20 सामना
5 सप्टेंबर तिसरा टी-20 सामना
8 सप्टेंबर पहिला वनडे सामना
11 सप्टेंबर दुसरा वनडे सामना
14 सप्टेंबर तिसरा वनडे सामना








