फखर झमानचे अर्धशतक, सामनावीर आफ्रिदीची अष्टपैलू खेळी
वृत्तसंस्था/ दुबई
पाकिस्तानने येथे झालेल्या गटातील शेवटच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातचा 41 धावांनी पराभव करून आशिया चषक टी-20 स्पर्धेत सुपर फोरमधील स्थान निश्चित केले. सुपर फोरमध्ये त्यांची लढत भारताविरुद्ध होणार आहे.
पाकने तीन सामन्यांत 4 गुण नोंदवत गटात दुसरे स्थान मिळविले. भारत या गटात 2 सामन्यात 4 गुण घेत आघाडीवर आहे. यूएईने नाणेफेक जिंकल्यानंतर पाकला प्रथम फलंदाजी दिली. फखर झमान (36 चेंडूत 50), कर्णधार सलमान आगा (20), मोहम्मद हॅरिस (14 चेंडूत 18) व शाहीन शहा आफ्रिदी (14 चेंडूत नाबाद 29) या चौघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. आफ्रिदीने शेवटच्या टप्प्यात जोरदार टोलेबाजी केल्यामुळे त्यांना 7 बाद 110 अशा स्थितीनंतर 9 बाद 146 धावांपर्यंत मजल मारता आली. यूएईच्या जुनैद सिद्दिकीने 18 धावांत 4 बळी मिळविले तर सिमरनजीत सिंगने 26 धावांत 3 बळी घेत त्याला चांगली साथ दिली.
यूएईला हे माफक आव्हान पेलवता आले नाही. तिसऱ्या षटकापासूनच त्यांच्या गळतीला सुरुवात झाली आणि पाकच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचा डाव 17.4 षटकांत 105 धावांत आटोपला. राहुल चोप्राने सर्वाधिक 35, ध्रुव पराशरने 20, मुहम्मद वासिमने 14 व अलिशान शराफूने 12 धावा केल्या. इतरांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. शाहीन शहा आफ्रिदी, हॅरिस रौफ, अब्रार अहमद यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. सईम आयुब व सलमान आगा यांनी एकेक बळी टिपला.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान 20 षटकांत 9 बाद 146 : फखर झमाना 36 चेंडूत 50, शाहीन आफ्रिदी 14 चेंडूत नाबाद 29, सलमान आगा 20, हॅरिस 18, जुनैद सिद्दिकी 4-18, सिमरनजीत सिंग 3-26. संयुक्त अरब अमिरात 17.4 षटकांत सर्व बाद 105 : राहुल चोप्रा 35, ध्रुव पराशर 20, अवांतर 11, आफ्रिदी 2-16, रौफ 2-19, अब्रार अहमद 2-13.









