वृत्तसंस्था/ सिडनी
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील येथे बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी पाक संघाची घोषणा करण्यात आली असून वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी आणि सलामीचा फलंदाज इमाम उल हक यांना विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून विजयी आघाडी घेतल्याने आता या शेवटच्या कसोटीत पाकचा संघ व्हाईटवॉश टाळण्यासाठी प्रयत्न करेल.
2024 च्या नव्या वर्षातील ही पहिली कसोटी आहे. पाक संघामध्ये 21 वर्षीय सईम आयुब आणि 30 वर्षीय साजिद खान यांना संघात स्थान देण्यात आले आहे. सईम आयुब आपले कसोटी पर्दापण करणार आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या टी-20 क्रिकेट सामन्यात त्याने आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्दापण केले होते. आतापर्यंत त्याने 8 टी-20 सामने खेळले असून त्यामध्ये 123 धावा जमविल्या आहेत. साजिद खानने तब्बल दोन वर्षांनंतर पाक संघात पुन्हा स्थान मिळविले आहे. 2022 च्या मार्चमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात साजिद खानचा समावेश होता. त्याची ही शेवटची कसोटी होती. साजिद खानने आतापर्यंत 7 कसोटी सामन्यात 22 गडी बाद केले आहेत.
या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघामध्ये कोणताही फेरबदल करण्यात आलेला नाही. दुसऱ्या कसोटीतील संघ शेवटच्या कसोटीसाठी कायम ठेवण्यात आला आहे. सलामीच्या डेव्हिड वॉर्नरची ही शेवटची कसोटी असून या कसोटीवेळी त्याला ऑस्ट्रेलियन शौकिनांकडून निरोप दिला जाईल. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया सध्या तिसऱ्या स्थानावर आहे.
पाक संघ : सईम आयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकिल, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, साजिद खान, हसन अली, मीर हमजा आणि अमिर जमाल.
ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), वॉर्नर, उस्मान ख्वाजा, लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, हेड, मार्श, कॅरे, स्टार्क, लियॉन आणि हॅजलवूड.









