वृत्तसंस्था /इस्लामाबाद
भारताचा शेजारी देश पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन सोमवारी साजरा झाला आहे. यावेळी बोलताना पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांनी देशाला स्वत:चे स्वातंत्र्य कसे राखायचे हे चांगलेच माहित असल्याचे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानला संपवू शकणारी शक्ती या पृथ्वीतलावर नाही असे म्हणत मुनीर यांनी काश्मीरचा राग आळवला आहे. 76 वर्षांपूर्वी ज्याप्रकारे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले, तसेच काश्मीरच्या लोकांना देखील कब्जा करणाऱ्या शक्तींपासून स्वातंत्र्य मिळेल असे त्यांनी म्हटले आहे. काश्मीरसंबंधी चर्चा करण्यासाठी पाक सैन्यप्रमुखांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले आहे. भारताच्या राष्ट्रवादाकडे जगाने लक्ष देण्याची गरज आहे. कुठलाही आक्रमक विचार आम्हाला कमकुवत करू शकत नाही. हे क्षेत्र दोन आण्विक शक्तींदरम्यान शत्रुत्व झेलण्याच्या स्थितीत नाही. आमचा प्रतिस्पर्धी राजकीय लाभासाठी आमच्या विरोधातील स्वत:चे इरादे पुढे नेत असल्याचा दावा मुनीर यांनी केला आहे.
अफगाणिस्तानला आवाहन
पाकिस्तानात एका मागोमाग होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांसंबंधी बोलताना सैन्यप्रमुख मुनीर यांनी अफगाणिस्तानच्या लोकांना चांगले शेजारी होण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तान चांगला यजमान राहिला असून अफगाणने देखील स्वत:च्या भूमीचा आमच्या विरोधात वापर होऊ देऊ नये असे मुनीर म्हणाले. अफगाणिस्तानात टीटीपी म्हणजेच तहरीक-ए-तालिबानच्या सदस्यांना अल-कायदाकडून प्रशिक्षण मिळत असल्याचे वृत्त समोर आले आहे.









