भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंटच्यावतीने विविध पदांवर कर्मचाऱ्यांची भरती करून घेतली जात आहे. मात्र, निवड प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आला होता. याबाबत कोणतीच दखल घेण्यात आली नसल्याने संरक्षण मंत्रालयाकडे तक्रार करून ‘पैसे दो नोकरी लो’ या अभियानाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कॅन्टोन्मेंट कार्यालयातील विविध पदे रिक्त असल्याने सहा महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कामगार, वाहनचालक व इतर पदांवर भरती करून घेण्यात येत आहे. या पदांवर भरती करताना भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांच्याकडे करण्यात आला होता. कॅन्टोन्मेंटमधील सॅनिटरी इन्स्पेक्टर पदासाठी आयोजित निवड प्रक्रियेवेळी तीन अर्जदारांची नावे पात्र असल्याबाबत नोटीस लावण्यात आली होती. यापैकी दोन अर्जदार स्किल टेस्टवेळी उपस्थित होते. तरीही एकही उमेदवार पात्र नसल्याची नोटीस कॅन्टोन्मेंटने लावली होती. त्यामुळे निवड प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भरतसिंग चौधरी यांनी केला आहे. याबाबत तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे चैधरी यांनी संरक्षण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. 14 जानेवारी रोजी झालेल्या निवड प्रक्रियेवेळी पात्र उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. भरती प्रक्रियेवेळी मोठ्या प्रमाणात रक्कम मोजली जात आहे. पात्र उमेदवारांना अपात्र ठरवून रक्कम देणाऱ्या उमेदवारांची निवड केली जात आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटमध्ये चाललेल्या भरती प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
सध्या कॅन्टोन्मेंटमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून ‘पैसे दो नोकरी लो’ असे अभियान सुरू आहे. त्यामुळे या अभियानाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लेखी तक्रारीद्वारे भरतसिंग चौधरी यांनी संरक्षण मंत्रालयाकडे केली आहे.









