प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाने संभल येथील जामा मशिदीसंबंधी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मशिदीतील रंगकाम तीन सदस्यीय तज्ञ समितीच्या देखरेखीत केले जावे, जेणेकरून मशिदीच्या ऐतिहासिक अन् संरचनात्मक महत्त्वाला कुठलेही नुकसान पोहोचू नये असे उच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या समितीत तीन सदस्य सामील असतील, ज्यात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा एक तज्ञ असेल जो मशिदीच्या ऐतिहासिक संचरनेला कुठलेही नुकसान होणार नाही हे पाहणार आहे. तर एक वैज्ञानिक देखील यात सामील असेल, जो रंगकामासाठी वापरण्यात येणाऱ्या सामग्रीचे विश्लेषण करणार आहे. याचबरोबर प्रशासनाचा एक अधिकारी कामावर देखरेख ठेवणार आहे.
तीन सदस्यीय समितीने गुरुवारीच मशिद परिसराची पाहणी केली आहे. या पाहणीत कुठल्याही संरचनात्मक नुकसानीशिवाय रंगकाम कसे करता येऊ शकेल हे यावेळी पाहिले गेले. समिती शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत यासंबंधी विस्तृत अहवाल न्यायालयासमोर सादर करणार आहे. मशिदीत रंगकाम कुठल्या पद्धतीने केले जाऊ शकेल, कुठल्या रंग अन् सामग्रींचा वापर करण्यात यावी, संरचनेच्या संरक्षणासाठी कोणते उपाय करण्यात यावेत हे यात नमूद असणार आहे. मशिदीच्या मूळ संरचनेला कुठलेच नुकसान पोहोचू नये असे न्यायाधीश रोहित रंजन अग्रवाल यांनी म्हटले आहे. संबंधित काय तज्ञांच्या देखरेखीतच पूर्ण केले जावे, असा निर्देश न्यायालयाने प्रशासन आणि संबंधित विभागांना दिला आहे. संभल जामा मशिदीची ऐतिहासिकता पाहता उच्च न्यायालयाने अत्यंत संतुलित आणि सावध निर्णय घेतला आहे.









