एस. सी. मोटर्स येथील विकासकामे राबवताना प्रकार
बेळगाव : गांधीनगरजवळील एस. सी. मोटर्स येथील रस्त्यांचे विकासकाम केले आहे. मात्र, गटारींची विकासकामे न करताच गटारींवर पदपथ निर्माण करण्यात येत आहेत. यामुळे भविष्यात परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. गटारींची विकासकामे राबवूनच पदपथ निर्माण करावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत. एस. सी. मोटर्सजवळील मारुतीनगर येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. याबरोबरच पदपथ निर्माण करण्यात येत आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या हे पदपथ निकृष्ट दर्जाचे ठरत आहे. या भागातील गटारींचा अनेक वर्षापासून विकास झालेला नाही. सध्या असणाऱ्या गटारी अवैज्ञानिकरित्या बांधल्या आहेत. सांडपाण्याचा निचरा न होता पाणी साचून राहात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत आहे. परिणामी, नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने गटारीचे पाणी घरामध्ये शिरत आहे. याची माहिती असूनही अधिकाऱ्यांनी विकासकामे राबवताना कोणतीच दखल घेतली जात नाही, असा आरोप नागरिकांतून केला जात आहे. काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याच्या बाजूने पदपथ निर्माण करण्यात येत आहे. तत्पूर्वी ढासळलेल्या गटारींचे बांधकाम करावे. यानंतरच पदपथ निर्माण करावे, अशी मागणीही नागरिकांतून करण्यात येत आहे. याकडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे व समस्या दूर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.









