अमेरिका, ब्रिटनसमवेत युरोपीय देशांमधील प्रकार
कंपन्या आतापर्यंत कर्मचाऱ्यांना फर्टिलिटी ट्रीटमेंट, मेंस्ट्रुअल लीव्ह यासारख्या सुविधा देत आल्या आहेत, परंतु आता कंपन्यांनी घटस्फोटाच्या प्रक्रियेला सामोरे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुविधा पुरविण्यास सुरुवात केली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना न्यायालयीन सुनावणीसाठी हजर रहावे लागत असल्याने त्यांना सुटी दिली जात आहे. तसेच त्यांना सुविधाजनक वेळेत कार्यालयीन काम करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
घटस्फोटाचा मानसिक आरोग्य आणि काम करण्याच्या क्षमतेवर मोठा प्रभाव पडत असतो. अशा स्थितीत त्यांना सर्वप्रकारच्या सहकार्याची गरज असते. जोडीदारापासून वेगळे होण्यादमयान कर्मचारी नकारात्मक भावनांनी वेढलेले असतात. अशा स्थितीत त्यांना आवश्यक सुविधा पुरवून त्यांना दु:खातून बाहेर पडण्यास मदत केली जात असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले.

थेरपी देखील उपलब्ध
अमेरिकेतील एका कंपनीने घटस्फोटाच्या प्रक्रियेला सामोरे जाणाऱ्या 12 हजार कर्मचाऱ्यांसाठी सहाय्यता कार्यक्रम सुरू केला. यात थेरपी आणि कायदेशीर सहाय्य देखील सामील होते. तर ब्रिटनमध्ये घटस्फोटादरम्यान मुलांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी कुटुंब-अनुकूल धोरणांसाठी पुढाकार घेतल होता. अन्य युरोपीय देशांमधील कंपन्या स्वत:च्या कर्मचाऱ्यांना मानसिक आणि आर्थिक मदतीची सुविधा देत आहेत. तसेच त्यांचे समुपदेशन देखील करविले जात आहे.
घटस्फोटित स्त्रियांची स्थिती
अमेरेकच्या न्याय विभागानुसार 2006 मध्ये घटस्फोटानंतर 33 टक्के महिलांना लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले आहे. घटस्फोटिक महिलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन अत्यंत प्रतिगामी आहे. घटस्फोटित महिलांना याचमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे समुपदेशन तज्ञांकडून सांगण्यात आले. विवाह संपुष्टात येण्यासाठी केवळ पुरुषच जबाबदार असतो असे नाही. पुरुष देखील भावुक असतात आणि घटस्फोटाचा त्यांच्या मनावर प्रतिकूल प्रभाव पडत असतो. परंतु महिलांच्या तुलनेत ते अधिक व्यवहार्य भूमिका लवकर घेऊन स्वत:ला लवकर सावरू शकतात. तसेच समाज हा घटस्फोटित पुरुषाबद्दल अधिक सहानुभूती बाळगणारा असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.
3750 वर्षांपूर्वी सुरू झाली घटस्फोटाची प्रथा
घटस्फोटाची प्रथा बेबीलोनचे राजे हाम्मुरबी यांनी सुमारे 3750 वर्षांपूर्वी सुरू केली होती. बेबीलोन प्राचीन मेसोपोटामियाचे शहर होते, जे आता बगदाद म्हणून ओळखले जाते. तेथे दगडांमध्ये कोरण्यात आलेल्या 282 कायद्यांमध्ये घटस्फोटाचा देखील उल्लेख आहे. भारतात घटस्फोटाचा कायदा ब्रिटिश राजवटीत 1866 मध्ये तयार करण्यात आला होता.
फिलिपाईन्समध्ये घटस्फोट बेकायदेशीर
सद्यकाळात घटस्फोट घेणे सामान्य बाब आहे, परंतु जगातील 2 देशांमध्ये घटस्फोट घेणे बेकायदेशीर आहे. युरोपच्या रोममधील व्हॅटिकन सिटी आणि फिलिपाईन्समध्ये जोडप्यांना घटस्फोट घेता येत नाही. या देशांमधील बहुतांश लोक रोमन कॅथोलिक आहेत.









