प्रत्यक्षदर्शीची साक्ष, हत्याकांडानंतर केला गोळीबार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पहलगाम येथे 22 एप्रिलला क्रूर हल्ला करुन 26 निरपराध्यांचे बळी घेतल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करुन आनंदोत्सव साजरा केला होता, अशी साक्ष एका प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. पहलगामच्या बैसारन वन प्रदेशात हा दहशतवादी हल्ला झाला होता. निरपराध पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन मारण्यात आले होते. या घटनेचा तपास केला जात असून प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी नोंदविल्या जात आहेत. स्थानिकांच्या आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षींना महत्व देण्यात येत आहे.
26 निरपराध्यांचे बळी घेऊन तीन दहशतवाद्यांनी तेथून जाताना हवेत गोळीबार केला होता. हा गोळीबार त्यांनी त्यांचा हल्ला यशस्वी झाल्यामुळे आनंद व्यक्त करण्यासाठी केला. जाताना या साक्षीदाराशी त्यांचा वादही झाला होता. तथापि, त्यांना लवकरात लवकर तेथून काढता पाय घ्यायचा असल्याने त्यांनी या साक्षीदाराला जिंवत सोडले होते. या साक्षीदासासमवेत त्याचे इतर सहकारी असल्याने दहशतवाद्यांना त्याचे अपहरण करणे जमले नाही, असा घटनाक्रम तपासात उघड झाला आहे. दहशतवाद्यांचा हेतू केवळ हिंदू पर्यटकांना ठार करण्याचा होता. त्यामुळे त्यांनी स्थानिक मुस्लिमांना मारण्याचा प्रयत्न केला नाही. जो एक स्थानिक मुस्लीम दहशतवाद्यांना विरोध करत होता, त्याला मात्र त्यांनी ठार केले, असेही आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. यावरुन हा हल्ला केवळ हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी कट्टर धर्मांध भावनेतून करण्यात आला होता, हे उघड होत आहे. लवकरच या तपासाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
सुलेमानचा सहभाग
ज्या तीन दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ला केला, त्यांच्यात सुलेमान नामक कुख्यात दहशतवाद्याचा समावेश होता. हा दहशतवादी लष्करे तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेचा सक्रीय हस्तक असून तो स्वत: पाकिस्तानी आहे. तो या हल्ल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. तो जम्मू-काश्मीरमधील इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्येही पोलिसांना हवा आहे. त्याच्यावर बक्षिस घोषित करण्यात आले आहे., अशी माहिती आतापर्यंत देण्यात आली आहे.
दोन स्थानिकांचे सहकार्य
दहशतवाद्यांना दोन स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले होते. पर्यटकांची संख्या दहशतवाद्यांना या स्थानिक नागरिकांकडूनच समजली होती. या स्थानिकांना राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडून महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्याचा या प्राधिकरणाचा प्रयत्न आहे. त्यांच्यापैकी दोन दहशतवादी अद्याप काश्मीर खोऱ्यातच दडून असावेत असे अनुमान आहे. त्यांना शोधण्याचा प्रयत्न कसून केला जात आहे. मधल्या काळात एनआयएने या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या काही स्थानिकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.









