वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तानमधील एका कार्यक्रमात पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधारासह लष्करे तोयबाचे दहशतवादी पाकिस्तानी मंत्र्यांसमवेत असल्याचे दिसून आले आहे. यावरुन पाकिस्ताचे प्रशासन दहशतवाद्यांच्या किती आहारी गेले आहे, हे स्पष्ट होत आहे. पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला कसुरी हा असल्याचे मानण्यात येते. तोही या कार्यक्रमात उपस्थित होता. त्याने भाषणही केले. लष्करे तोयबाचा सहसंस्थापक अमीर हामजा आणि हाफीझ सईद याचा मुलगा तल्हा सईद याचीही उपस्थिती या कार्यक्रमाला होती. हे दहशतवादी पाकिस्तानची ओळख आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो, असेही प्रतिपादन पाकिस्तानच्या मंत्र्यांनी केले.
मी जगात प्रसिद्ध
पहालगाम हल्ल्यानंतर आपल्याला साऱ्या जगात ओळख आणि प्रसिद्धी प्राप्त झाली आहे, अशी दर्पोक्ती कसुरी याने केली. भारताच्या सिंदूर अभियानात जे दहशतवादी मारले गेले आहेत, ते शहीद आहेत. त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत, अशी गुर्मीची भाषाही त्याने केली. जम्मू-काश्मीर पाकिस्तान होईल तर भारताचा पंजाब खलिस्तान होईल, अशी प्रक्षोभक भाषाही कसुरी याने केली.









