रक्षाबंधन आठवडय़ावर : राख्या खरेदीची लगबग
प्रतिनिधी / बेळगाव
बहीण-भावाचं नातं दृढ करणारी नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) अवघ्या आठवडय़ावर येऊन ठेपल्याने बाजारात विविध प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये राखी आणि विविध वस्तू खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. याबरोबरच विविध राख्यांनी बाजारपेठ बहरली आहे.
बहीण-भावाच्या अतूट नात्यांना रेशीम धाग्यांनी जोडणारा सण जवळ आल्याने राख्या खरेदीसाठी बाजारात लगबग पाहायला मिळत आहे. विशेषतः तरुणी, महिला विविध डिझाईन्समध्ये असलेल्या राख्यांची खरेदी करताना दिसत आहेत. साधारण 10 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध आहेत. पारंपरिक गोंडय़ाच्या राख्यांबरोबर नवीन राख्याही उपलब्ध झाल्या आहेत. अलीकडे नवीन आलेल्या राख्यांकडे तरुणींचा कल वाढला आहे. त्यामुळे त्या राख्यांची अधिक विक्री होत आहे, अशी माहिती राखी विपेत्यांनी दिली.
श्रावण, रक्षाबंधन यामुळे बाजारपेठेत राख्या, फळे, हार, फुले व इतर साहित्याला मागणी वाढली आहे. बाजारपेठेत पारंपरिक गोंडय़ाच्या राख्यांऐवजी डोरेमॉन, छोटा भीम व लायटिंगच्या राख्यांची पेझ वाढली आहे. गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, समादेवी गल्ली आणि इतर ठिकाणीदेखील किरकोळ विपेत्यांकडून राख्यांची विक्री सुरू आहे. साधारण 36, 38, 40, 60 रु. अशी एक डझन राख्यांची किंमत आहे.
रेशीम धागे, मोती, रुद्राक्ष अशा सुंदर आकर्षक राख्याही विविध डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. रक्षाबंधन जसजसा जवळ येईल तसतशी राख्यांची मागणी वाढत आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे सण-उत्सवांवर निर्बंध आले होते. दरम्यान, बाजारपेठही थंडावलेली होती. मात्र, यंदा सण-उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे बाजारपेठही बहरलेली पाहायला मिळत आहे. दोन वर्षांनंतर विविध राख्यांनी बाजारपेठ पूर्ववत सजलेली दिसत आहे.









