वृत्तसंस्था/ रायपूर
प्रसिद्ध हास्यकवी, व्यंगचित्रकार आणि आयुर्वेदाचार्य पद्मश्री डॉ. सुरेंद्र दुबे यांचे गुरुवारी वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून एसीआय रायपूर येथे उपचार घेत होते. गुरुवारी दुपारी त्यांनी हृदयविकाराच्या झटक्याने अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रायपूरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
भारत सरकारने डॉ. दुबे यांना 2010 मध्ये पद्मश्री देऊन सन्मानित केले होते. त्यापूर्वी 2008 मध्ये त्यांना काका हथरासी यांच्याकडून हास्यरत्न पुरस्कार देखील मिळाला होता. पद्मश्री डॉ. सुरेंद्र दुबे यांनी छत्तीसगडी भाषेला जागतिक मान्यता देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या दुबे यांचा जन्म 8 ऑगस्ट 1953 रोजी छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथील बेमेटारा येथे झाला होता. हास्यकवी म्हणून ते सुपरिचित होते. त्यांनी पाच पुस्तके लिहिली आहेत.









