कडधान्य पीक, भातगंज्यांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
प्रतिनिधी / बेळगाव
गुरुवारी पहाटेची वेळ… जलवाहिनी फुटली… पाणी वाया जाऊ लागले… ही बाब खरेतर नित्याचीच! पण यावेळी प्रशासनाने या समस्येची कधी नव्हे ते अत्यंत तत्परतेने दखल घेतली. कारणही तसेच. जलवाहिनी फुटल्यामुळे सुवर्णसौध येथे सुरू असलेल्या अधिवेशनाच्या ठिकाणचा पाणीपुरवठाच ठप्प झाला. अधिवेशनामुळे सर्व मंत्रिमंडळ सध्या बेळगावात आहे. अशावेळी जर सुवर्णसौधचाच पाणीपुरवठा ठप्प झाला तर कोणाचीच खैर नाही, हे कदाचित प्रशासनाने लक्षात घेतले असावे. परिणामी अत्यंत तत्परतेने ही समस्या दूर करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बेळगावहून हलगा येथील सुवर्णसौधला जाणाऱ्या जलवाहिनीला जयकिसान भाजीमार्केटजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली.
गुऊवारी पहाटेपासून गळतीद्वारे पाणी वाया जात असल्याने परिसरातील 50 एकरहून अधिक जमीन पाण्याखाली गेली आहे. यामध्ये एका शेतकऱ्याच्या मळणीचेही नुकसान झाल्याने 50 पोत्याहून अधिक भात पाण्यात भिजले आहे. त्यामुळे आधी नुकसानभरपाई द्या, नंतरच जलवाहिनी दुरुस्त करा, अशी भूमिका घेऊन शेतकऱ्यांनी जलवाहिनीच्या दुरुस्तीस आक्षेप घेतला आहे.
सुवर्णसौधला पाणीपुरवठा करण्यासाठी बसवनकोळ जलशुद्धीकरण केंद्रातून थेट जलवाहिनी घालण्यात आली आहे. मात्र या जलवाहिनीचे वारंवार नुकसान होत असल्याने गळती लागते. यापूर्वीदेखील अनेकवेळा गळती लागून जलवाहिनीद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते. याच पद्धतीने गुरुवारी पहाटे जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली. पाण्याचा दाब जास्त असल्याने भरपूर पाणी वाया गेले. परिसरातील 50 एकरहून अधिक शेतजमीन पाण्याखाली गेली.
परिसरात काही शेतकऱ्यांनी कडपाल घातले असून काही शेतकऱ्यांची भातकापणी शिल्लक आहे. त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांनी भातकापणी करून भात जमा करून ठेवले आहे. ठेवलेल्या भातगंज्यांमध्ये पाणी शिरल्याने संपूर्ण भाताचे नुकसान झाले आहे. तसेच येथील शेतकरी अरुण पुजारी यांनी बुधवारी रात्री भाताची मळणी घातली होती. गळती लागलेल्या जलवाहिनीद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत राहिल्याने मळणीमध्ये पाणी शिरले आहे. पाहता पाहता संपूर्ण भाताची मळणी पाण्याखाली गेली. त्यामुळे भात वाहून गेले. 50 पोत्यांहून अधिक भात खराब झाले असून अरुण पुजारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच भातगंज्यांमध्ये पाणी शिरले असून काढणीसाठी आलेले चणी, वाटाणा, हरभरा असे पीकदेखील खराब झाले आहे.
जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एलअॅण्डटी कंपनीचे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. पण दुरुस्ती करण्यास शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन गळती लागण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच प्रथम पिकाची नुकसानभरपाई म्हणून 5 लाख रुपये शेतकऱ्यांना द्या, नंतरच दुरुस्ती करा, अशी मागणी केली. दुरुस्ती करण्यास विरोध दर्शविला. जलवाहिन्यांच्या गळतीमुळे शहर परिसरात पाणी वाया जात असते. पण त्यामुळे नागरिकांचे कोणतेही नुकसान होत नाही. मात्र शेतवडीतून गेलेल्या जलवाहिन्यांना वारंवार गळती लागून पाणी वाया जात असल्याने पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे दुरुस्तीचेही काम व्यवस्थित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रशासन अडचणीत
शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासन अडचणीत आले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी हुज्जत घातली. शेतकरी ऐकत नाहीत, हे लक्षात येताच जिल्हाधिकारी नितेश पाटील घटनास्थळी हजर झाले. त्यांनी बराचवेळ शेतकऱ्यांची मनधरणी केली. आजपर्यंत आम्हाला प्रशासनाने आणि सरकारने वाटाण्याच्या अक्षताच लावल्या आहेत, असे म्हणून शेतकरी अडून बसले. तेव्हा यावेळी तुम्हाला वेळीच नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी माझी, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. लगेच कृषी अधिकाऱ्यांना पाठवून नुकसानभरपाईचा आढावा घेतला. अधिवेशनाने काय साधले? असे अनेकांना वाटते. निदान या निमित्ताने शेतकऱ्यांनी सरकारला नमते घेण्यास भाग पाडले, हेही नसे थोडके!
नाक दाबले की तोंड उघडते!
शहरात जलवाहिन्यांना गळती लागणे हे काही नवीन नाही. परंतु, गुरुवारी शेतकऱ्यांनीसुद्धा प्रशासनाची चांगलीच गोची केली. एरव्ही अर्ज-विनंत्या करूनही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने जलवाहिनी फुटल्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांनीसुद्धा प्रशासनाची चांगलीच अडवणूक केली. जोपर्यंत नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत जलवाहिनी दुरुस्त करू देणार नाही, अशी भूमिका शेतकरी नेते नारायण सावंत आणि अन्य शेतकऱ्यांनी घेतली.