मजुरांचा भासतोय तुटवडा, नाहक भुर्दंड
वार्ताहर/धामणे
नंदिहळ्ळी येथील शेतकरी भर पावसातही शेतात भातरोपे लावण्यात व्यग्र आहेत. शेतकऱ्यांना अनेक अडचणींवर मात करत आपल्या शेतात पिकांची लागवड करावी लागते. कधी निसर्गाला सामोरे जावे लागते तर कधी रासायनिक खतांसाठी शासनाला सामोरे जावे लागते. सध्या नंदिहळ्ळी, नागेनहट्टी या भागातील शेतकरी भात रोपांची लागवड करत आहेत. नंदिहळ्ळी परिसरातील सर्वच शेतकरी भातपिकाची रोपे लावण्यात व्यग्र असल्याने मजुरांची कमतरता भासत असून बाहेरगावाहून मजूर आणावे लागत आहेत. त्यामुळे खर्चात वाढ झाल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. बाहेरगावच्या मजुरांना वाहनभाडे द्यावे लागल्याने शेतकऱ्यांना याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. रोप लागवडीनंतर खताची फवारणी करावी लागते, त्यामुळे सध्या येथील शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे.









