वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
ऐन पावसाळ्यात उन्हाचे चटके व अंगाची लाही अशा परिस्थितीत कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा परिसरामध्ये मार्कंडेय नदीकाठ शिवारामध्ये भातरोप लागवडीच्या अंतिम टप्प्यात बळीराजा गुंतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मार्कंडेय नदीला आलेल्या पुराआधी केलेली रोपलागवड कुजल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार रोप लागवड करावी लागत आहे. भात रोपाची जमवाजमव करण्यात शेतकरी गुंतला आहे. यावर्षी पावसाने प्रारंभापासून शेतकरी वर्गाला शेती मशागतीच्या कामापासून पेरणीपर्यंत चांगली साथ दिली. यावर्षी तर धूळवाफ व ओलीमध्येही पेरणी करायला पावसाने हंगाम दिला नसल्यामुळे कंग्राळी किर्यात परिसरातील जवळजवळ 70 ते 80 टक्के शेतकरी वर्गाने भात रोप लागवडीसाठी तरु घातल्याचे चित्र पहावयास मिळाले. पाणथळ शिवारामध्ये पावसाने पाणीच पाणी केल्यामुळे सर्व शेतकरीवर्गाने रोप लागवड केली असली तरी नंतर काही शेतकऱ्यांना मार्कंडेय नदीकाठ शिवारामध्ये रोप लागवड केली. परंतु यावर्षी पावसाने बरसण्याचा अगदी उच्चांक केल्यामुळे मार्कंडेय नदीला 20 ते 25 दिवस पूर राहिला. परिणामी मार्कंडेय नदीकाठ शिवारातील भातरोप लागवड केलेली रोपे तसेच पेरणी केलेली रोपे कुजून गेली.
हिरव्या चाऱ्याची टंचाई
मार्कंडेय नदीला पूर आल्यामुळे काठावरील व परिसरातील शिवारातील हिरवा चारा पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे जनावरांना खाण्यायोग्य राहिला नाही. यामुळे हिरव्या चाऱ्याची टंचाई भासत आहे. कडक उन्हामुळे गवतालाही पुराच्या पाण्याचा तांबडा राप जात असतो. यामुळे कडक उन्हाचाही फटका बसल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.
ऊस लागवड शेतकरी आनंदीत
यावर्षी परिसरामध्ये मार्कंडेय नदीकाठावरील शिवारामध्ये ऊस लागवडही मोठ्या प्रमाणात झाली असून सदर पुराचा ऊस पिकावर कोणताही परिणाम न झाल्यामुळे ऊस लागवड शेतकरी आनंदीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक शेतकरी पुढीलवर्षी ऊस लागवड करणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.









