कमी उत्पादनामुळे नाराजी : शेतकऱ्यांना आता केवळ चाऱ्याची चिंता
वार्ताहर /नंदगड
गेल्या दोन दिवसांपासून आकाशात दाटून येणारे ढग त्यामुळे पाऊस केंव्हा पडेल याची शाश्वती नाही. अशी परिस्थिती असताना पावसाची तमा न बाळगता शेतकरी वर्ग आपल्या शेतातील भातपिकांची कापणी करीतच आहेत. खानापूर तालुक्यात पावसाळ्यातील तीन-चार महिने बऱ्यापैकी पाऊस होतो. त्यामुळे येथील शेतकरी भातपिकांचे उत्पादन घेतात. खानापूर तालुक्यात प्रामुख्याने कापोली, हलगा, हलशी, बिडी, नंदगड, लोंढा, गुंजी, नेरसा, शिरोली, रामगुरवाडी, बरगाव, लालवाडी, चापगाव, गर्लगुंजी, लोंढा, जांबोटी, कणकुंबी तसेच हेम्माडगा येथे भाताचे पीक घेण्यात येते. यावर्षी मात्र तब्बल दोन महिने पावसाने ओढ दिली. पोसवण्यापूर्वीच भातपिके सुकून गेली. उत्पादन किती मिळणार यापेक्षा जनावरांना चारा तरी होईल, या विचाराने भातकापणी करण्यात येत आहे. सध्या माळरानावरील भातकापणी सुरू असून यापुढील आठवड्यापासून पाणथळ जमिनीतील भातकापणी करण्यात येणार आहे.
धामणे परिसरात भातकापणी जोरात
यंदा दरवर्षीपेक्षा पावसाने निराशाजनक हजेरी लावल्यामुळे शेतकरी संतुष्ट व आनंदी दिसत नाही. पाऊसच वेळेत झाला नसल्यामुळे धामणे, बस्तवाड, हलगा, नंदिहळ्ळी, देसूर, सुळगा (येळ्ळूर) या भागातील भातपीक यंदा म्हणावे तसे आलेले नाही. बासमती वगळता अन्य कोणतेचे भातपीक न आल्यामुळे या भागातील नाराज शेतकऱ्यांकडून 25 टक्केपेक्षा कमी असलेल्या भातपिकाची सध्या कापणी जोरात सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी या भागात पावसाळी भात, बटाटा, भुईमूग, रताळी ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. परंतु यंदा पावसाने म्हणावी तशी साथ दिली नसल्याने या भागात दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सर्वच पिकांवर यंदा वरूणराजाने अवकृपा दर्शविल्यामुळे बासमती वगळता या भागात घेतली जाणारी इंद्रायणी, मनीला, सोनम वगैरे भातपिकाची शेकडो एकर शिवारातील भातपिके आणि इतर पिकांसाठी रासायानिक खत, भांगलण आणि ट्रॅक्टरने केलेला मशागतीचा खर्च शेतकऱ्यांना नुकसानीचा ठरला आहे. आता हिवाळी कडधान्य पिकांची पेरणीही शेतकऱ्यांना करता येणार नाही. कारण पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शिवारातील जमिनीत ओलावा नाही. त्यामुळे याही पिकांची पेरणी खुंटल्यामुळे येथील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.









