वार्ताहर/नंदगड
मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा राहिल्याने पेरणीचा हंगाम केवळ दोनच दिवस मिळाला. पेरणी करून लागलीच पाऊस झाल्याने भाताची उगवण झाली नाही. आता पुन्हा तब्बल चार दिवस पाणी साचल्याने उरलेसुरले सर्वच पीक कुजत चालल्याने कौंदल, चापगाव भागातील शेतकरी हतबल झाला आहे. दरवर्षी मे महिन्याच्या मध्यावधीपासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भाताची पेरणी केली जाते. गेले पाच वर्ष वेळेत हंगाम मिळाल्याने पेरणी, कापणी व मळणी व्यवस्थित झाल्याने शेतातील उत्पादन बऱ्यापैकी वाढले होते. शेतकरी सुखी व समाधानी होता. दरवर्षीप्रमाणेच हंगाम मिळेल याच विचारात यावर्षी शेतकरी होता. परंतु मे महिन्यात व लागलीच जून महिन्यात पाऊस झाल्याने कौंदल, चापगाव, पारिश्वाड, हिरेमुनवळ्ळी, बंकी, भागासह अन्य बहुतांशी भागातील पेरणी झाली नाही. पेरणीचा हंगामातील म्हणून शेतकऱ्यांनी रोप लावण्यासाठी भाताचे तरुही टाकले नाही. त्यामुळे आता लावणी करण्यासाठी तरू मिळणे कठीण झाले आहे.









