मसूर :
कोपर्डे हवेली परिसर हा भात उत्पादनाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. शेतकरी जादा उत्पादन घेण्यासाठी पेरणीच्या तुलनेत भाताच्या रोपांची लावण करुन उत्पादन घेत असतात. सध्या रोप लावणीचा कालावधी आल्याने भात रोपाच्या लावणीसाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी करत आहेत.
ऊस क्षेत्रापाठोपाठ भाताचे क्षेत्र कोपर्डे परिसरात असते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकरी वाफे तयार करून भात टाकून रोपे तयार करतात आणि जुलै महिण्याच्या पहिल्या आठवड्यात भाताच्या तरावची लावणी करतात. त्यासाठी जमिनीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी केली जाते. रोपे लावताना त्याची योग्य लागण होते. शिवाय तणाचे प्रमाण कमी असते. चिखलणी करण्यासाठी पाण्याची गरज असते सध्या पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचून राहिले असल्याने चिखलणी सुरु आहे.
काही शेतकरी पाणी साचून राहण्यासाठी बांध धरतात, त्यामध्ये पाणी साचून राहते. रोपांची लावण करुन घेतलेल्या पिकास जास्त उत्पादन निघते. शिवाय भात जोमदार पध्दतीने येतो रोगाचे प्रमाण कमी असते. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकरी फवारण्या घेतात. यंदाच्या हंगामात जादा पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची तरवे वाया गेली असल्याने तरावाची टंचाई जाणवू शकते, अशे जाणकार शेतकऱ्यांचे मत आहे.
- उसानंतर भाताचे उत्पादन
कोपर्डे हवेलीच्या तांदळाला चांगली मागणी असल्याने उसानंतर भाताचे उत्पादन घेतले जाते. घरातच ग्राहक असल्याने जादा उत्पादन खर्च करुन शेतकरी उत्पादन घेतात.
- तणाचे प्रमाण कमी…
आम्ही जादा उत्पादन घेण्यासाठी जमिनीची चिखलणी करत असतो. त्यामुळे तणाचे प्रमाण कमी राहते. शिवाय रोपांची लावणी व्यवस्थित होते, मर कमी राहते. स्वप्निल चव्हाण, भात उत्पादक शेतकरी कोपर्डे हवेली.








