रोप लागवडीच्या मजुरीत वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांना भुर्दंड : भात रोपही महागले
वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्वभागातील कुडची, निलजी, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द आदी परिसरात भातरोप लागवडीचे काम जोरात सुरू आहे. तालुक्याचे पूर्वभागात मोठ्याप्रमाणावर धूळवाफ पेरणी केली जाते. मात्र यंदा धूळवाफ पेरणी करण्यासाठी हंगाम न मिळाल्याने शेतकरी रोप लागवडीकडे वळले आहेत. रोप लागवड ही बेळगाव पश्चिम भागात मोठ्याप्रमाणावर केली जाते. यावर्षी पावसाचा जोर वाढल्याने पूर्वभागातील पेरण्या खोळंबल्या. त्यामुळे शेतकरी रोप लागवडीकडे वळले आहेत. रोप लागवड हा अनुभव या भागातील शेतकऱ्यांना नवा नसला तरी यासाठी लागणारी मेहनत, पैशाचा खर्च, शिवाय महागडी रोपे यासाठी शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र रोप लागवडीच्या मजुरीत वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांना भुर्दंड सोसावा लागत आहे.
शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या वेतनाइतकीच मजुरी काही गावातील मजूर रोप लागवडीसाठी घेत आहेत. हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याने काही शेतकऱ्यांनी रोप लागवड न करण्याचे ठरवले आहे. तर काही शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत करून भात पेरले होते. पण हवामानातील बदलामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचा प्रसंग आला. तरीही भात तुरळक प्रमाणात उगवले. त्यामुळे या शेतकऱ्यांनाही रोप लागवडीचा पर्याय निवडावा लागला. शेतकरी भात रोपवाटिका या भागात तयार करत नसला तरी शेजारच्या गावातून रोपवाटिका महागड्या भावामध्ये विकत घेऊन लागवड करत आहे.









