तालुक्याच्या पूर्वभागातील शेतकऱ्यांना हुरहुर : पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात
वार्ताहर /सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये उन्हाचे चटके असह्या होत असून यामुळे भातपिके अक्षरश: करपून गेली आहेत. ऑक्टोबर हिटचा फटका पिकांना बसला असून शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे तालुक्याच्या पूर्व भागातील निलजी, मुतगा, शिंदोळी, बसरीकट्टी, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनीहाळ, पंत बाळेकुंद्री, मावीणकट्टी, मोदगा, सुळेभावी आदि गावातील भातपिके सध्या पावसाअभावी करपून गेली आहेत. सध्या भातपिके पोसवण्याच्या प्रक्रियेत असून यावेळी पावसाची नितांत गरज होती. मात्र गेल्या आठ दिवसापासून कडक ऊन पडू लागल्याने या ऑक्टोबर हिटमुळे अक्षरश: भातपिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा भातपिके मिळण्याची आशा धुसर झाली आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
भात पिकांना विहिरी व कूपनलिकांचा आधार
वाढत्या उन्हामुळे भातपिके करपून जात असताना शेतकऱ्यांनी विहिरी व कूपनलिकांचे पाणी सोडण्यास प्रारंभ केला आहे. मात्र हे पाणीदेखील अपुरे पडत आहे. अशातच हेस्कॉमकडून वेळोवेळी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग भात पिकाला पाणी सोडण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. गेल्या चार दिवसापासून पूर्व भागामध्ये सतत दाट धुके पडत आहेत. त्यामुळे याबद्दल शेतकरी वर्गातून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पाऊस पडणार असेल किंवा पाऊस लांबणार असेल. त्यावेळी अशाप्रकारे धुके पडतात असे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.
अपुऱ्या वीजपुरवठ्याने हैराण
यंदा पूर्व भागावर दुष्काळाचे सावट पसरले असून पावसाअभावी पिके करपून जात आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात ओढला जाणार आहे. अशातच वीजपुरवठाही वेळोवेळी खंडित होत असल्याने पिकांना पाणी सोडणे कठीण होऊन बसले आहे.
– पिराजी अंतोजी









