येळ्ळूर परिसरातील चित्र : शेतकरी चिंताग्रस्त
वार्ताहर/येळ्ळूर
मृग नक्षत्राच्या उघडझापामुळे कोळपणीत व्यस्त असणाऱ्या शेतकऱ्यांच्या श्रमावर आर्द्रा सरीमुळे भातवाफे पाण्याने तुडुंब भरले आहेत. कोवळी पिके पुन्हा पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून ती कुजण्याच्या भीतीने चिंताग्रस्त झाला आहे. अजून काही ठिकाणी भाताची उगवण व्हायची आहे तर काही ठिकाणी वाफ जमिनीसमान असतानाच ते पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते की काय, याची चिंता पडली आहे. शिवाय मुळातच भातपिकाची उगवण विरळ झाली असताना पुन्हा पाण्याच्या तडाख्यात ती सापडल्याने पिकाला मार बसणार आहे. भात हे पाण्यावरील पीक असले तरी अजून कोवळे असल्याने पीक पाण्यासाठी आले नाही.
पावसाची उघडझाप व एक-दोन कोळपणीसह खताच्या मात्रांमुळे पिकाची वाढ झपाट्याने होते. पण तशी संधी आर्द्रा नक्षत्राने दिली नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. अशातच पाण्याने वाफे भरल्याने जमिनीतील खेकडे वर येऊन कोवळ्या भातरोपांचा फडशा पाडतात. ते संकट आता शेतकऱ्यांसमोर असून खेकड्यांपासून कोवळी रोपे वाचवण्यासाठी औषधाची तजवीज करावी लागणार आहे. पावसाचा जोर बघता वाफ्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकरी वर्ग बाहेर पडला र्आहे. यातून भातपीक सावरण्यासाठी पावसाने उघडीप दिली पाहिजे. अन्यथा पिके कुजून जाण्याच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांना भातरोपांची शोधाशोध करावी लागणार आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर दुबार पेरणीही शक्य नाही. त्यामुळे पावसाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता उघडीप द्यावी, अशी विठुरायापाशी मागणी सुरू आहे.









