पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान : शेतकऱ्यांनी केली कापणीला सुऊवात : उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता
वार्ताहर/किणये
गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून झालेल्या परतीच्या दमदार पावसामुळे भातपिके आडवी झाली आहेत. त्याचबरोबर अन्य पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवसापासून पावसाने थोड्या प्रमाणात विश्र्रांती दिली आहे. आता तोंडाला आलेली भातपिके आडवी झाल्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरीही आडवी झालेली भातपिके कापण्यासाठी शेतशिवारात बळीराजाची धडपड सुरू झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यंदा मान्सून कालावधीत मुसळधार पाऊस झाला. नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यामुळे नदीकाठच्या शिवाराजवळ असलेल्या भातपिकांमध्ये थेट पाणी शिरले व पिके कुजून गेली. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार भातरोप लागवड केली. काही शिल्लक राहिलेली भातपिकं बहरून आली होती. ती पोसवून येत होती आणि याच कालावधीत परतीच्या पावसाने अक्षरश: तालुक्मयात धुमाकूळ घातला. परतीचा पाऊस इतका जोरदार झाला की, नदी-नाल्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली. तशीच पोसवलेली भातपिके आडवी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरवषी शेतकरी दिवाळीला शेत-शिवारात पूजा करून भातकापणीला सुऊवात करतात. यंदा मात्र परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कारण या पावसामुळे भातपिकांचे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. तालुक्मयात शेतकऱ्यांनी बासमती, इंद्रायणी, मधुरा, अंतरसाळी, सोना मसुरा, सोनम, भाग्यलक्ष्मी, इंटान, दोडगा, चिंटू, शुभांगी आदी विविध जातीची भात रोप लागवड अथवा पेरणी केलेली आहे. ही भातपिके पोसवून आली होती. भात पोसविण्याच्या कालावधीतच मुसळधार पाऊस झाला आणि बहुतांशी शिवारातील भातपिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले.
मजुरीसाठी अमाप खर्च
भातपिकासाठी भात पेरणी, बियाणे, रासायनिक खते, कोळपणी, भांगलण, तसेच रोप बनविणे, रोप लागवडीसाठी पॉवर ट्रिल्लरच्या साहाय्याने व बैलजोडीच्या साहाय्याने मशागत करणे, रोपांची लागवड, भांगलण, खताची फवारणी, शेतमजूर आदींसाठी शेतकऱ्यांनी वारेमाप पैसा खर्च केलेला आहे. वर्षभर शिवारात काबाडकष्ट करून त्यासाठी पैसा खर्च करून सुगी जमा करण्याचा शेतकऱ्यांचा ध्यास असतो. या धान्यरूपी सुगीच्या माध्यमातून त्यांचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो. यंदा मात्र परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. पावसामुळे भातपिके आडवी झाली. तरीही त्याची कापणी तर करावीच लागणार. यामुळे गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिली असल्यामुळे सध्या शेतकरी या भातपिकाची कापणी करताना दिसत आहे. पावसामुळे भातपिकांचे नुकसान झाले असून साहजिकच यंदा भात उत्पादनात घट होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.









