मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटीलांचे उपोषण सुरू आहे. शुक्रवारी उपोषणांचा तिसरा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत, सकल मराठा समाज व सर्व ग्रामस्थांच्या वतीने आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. तसेच सर्व निवडणुकांतील मतदानांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला आहे याबाबत आज फलक लावून या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी सरपंच तानाजी पालकर म्हणाले, ‘ मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आंदोलन पुकारले आहे.’ सुरेश पाटील म्हणाले, ‘ग्रामपंचायत व सर्व समाजाच्या वतीने, सर्व तरुण मंडळे, सर्व संस्था, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यत कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश मिळणार नाही. असा निर्णय घेतला आहे.
यावेळी तानाजी पाटील, दीपक पाटील, विष्णुपंत पाटील, रोहन पालकर, अमित पाटील, विशाल सोनार, सूरज पाटील, ऋतुराज पाटील, मदन पाटील, विजय ढेंगे, तानाजी भाऊ पाटील, संदीप पाटील, संग्राम भापकर, उपस्थित होते. वसंत तोडकर









