हंगामातील पहिला हिमवर्षाव ः पुढील आठवडा ठरणार धोक्याचा
जोशीमठ / वृत्तसंस्था
गेल्या अनेक दिवसांपासून दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या जोशीमठमध्ये शुक्रवारी सकाळी हंगामातील पहिला हिमवर्षाव झाला. या हिमवृष्टीमुळे जोशीमठमधील नागरिकांची भीती आणखीनच वाढली आहे. हिमवृष्टीमुळे धोकादायक घरे पाडण्याचे काम शुक्रवारी थांबवण्यात आले आहे. जोशीमठसह चमोली आणि पिथौरागढमध्ये 23 आणि 24 जानेवारीलाही पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हा अंदाज खरा ठरल्यास पुढील आठवडा जोशीमठमधील मदत व बचावकार्यासह पाडकामासाठी आव्हानात्मक ठरणार आहे
शुक्रवारपासून सुरू झालेल्या पाऊस आणि हिमवृष्टीमुळे हॉटेल आणि धोकादायक घरे पाडण्याचे काम थांबवण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून दरड वाढलेली नाही. मात्र, जेपी कॉलनीजवळील भूमिगत जलवाहिनीतून पाण्याचा विसर्ग पुन्हा 150 लिटर प्रतिमिनिट झाला आहे. आतापर्यंत 849 घरांमध्ये तडे गेल्याची नोंद झाली आहे, तर 259 बाधित कुटुंबांना तात्पुरत्या मदत केंद्रात हलवण्यात आले आहे, असे आपत्ती व्यवस्थापन सचिव डॉ. रणजित कुमार सिन्हा यांनी शुक्रवारी सांगितले. त्यांनी दोन्ही ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांचा अभ्यास करणाऱया प्राथमिक अहवालाचा हवाला देत दोन्हींचे स्वरुप वेगळे असल्याचे सांगितले. तथापि, हा फक्त एक प्राथमिक अहवाल असून त्यावरून कोणताही अंतिम निष्कर्ष काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जोशीमठमध्ये दरड कोसळणे, घरांना तडे जाणे, पाणी झिरपणे यासारख्या समस्या समोर आल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार गंभीर झाले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेली केंद्राची पथके दाखल झाली आहेत. यापूर्वी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. या अहवालाच्या माध्यमातून या भागातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत.
उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये जमीन खचत असल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. तेथील घरे, रस्ते आणि शेतात मोठमोठय़ा भेगा पडल्या आहेत. आतापर्यंत जोशीमठमधील शेकडो कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. जोशीमठ अवघ्या 12 दिवसांत 5.4 सेंटीमीटरपर्यंत खचल्याचे सॅटेलाईट इमेजमधून दिसून आले आहे. 27 डिसेंबर 2022 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान जोशीमठमध्ये 5.4 सें.मी. भूस्खलनाची नोंद झाली आहे. तसेच एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान जोशीमठमध्ये 9 सेंटीमीटरपर्यंत भूस्खलन झाले आहे.









