पाचगाव वार्ताहर
जालना जिल्ह्यातील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आर के नगर येथे मराठा समाजाच्या वतीने विराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी दहा वाजता आर के नगर नाका ते खडीचा गणपती मंदिर अशी निषेध यात्रा काढण्यात आली. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा समाजातील आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला होता. त्याच्या निषेधार्थ आर के नगर, पाचगाव ,मोरेवाडी परिसरातील नागरिक, व्यापारी यांनी कडकडीत बंद पाळला. परिसरातील सर्व दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती. यामुळे नेहमी गर्दीने ओसंडून वाहणारे रस्ते ओस पडले होते.
सकाळी दहा वाजता ठाकरे गट शिवसेना करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आर के नगर नाका ते खडीचा गणपती मंदिर पर्यंत जालना येथील आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराचा निषेध करत मराठा समाजाच्या वतीने निषेध यात्रा काढण्यात आली. या निषेध यात्रेत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जालना जिल्ह्यातील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध करत मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी विराज पाटील यांनी केली.
या निषेध यात्रेत शिवसेना तालुकाप्रमुख विराज पाटील, अरुण अबदागिरी, दत्तात्रेय भिलुगडे, संग्राम पोवाळकर, नारायण गाडगीळ, संजय पाटील, ऋषिकेश व्हन्नुरे, विकी काटकर,अतुल गवळी, संदीप गाडगीळ, अमर मोरे, चंद्रकांत संकपाळ, प्रकाश मोरे, बाबुराव भोसले,सचिन पाटील,शांताराम पाटील,संग्राम पाटील, ऋषिकेश येवलुजे, मारुती सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









