वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 च्या बॅडमिंटन हंगामातील विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या बॅडमिंटन टूरवरील दुसरी स्पर्धा येथे मंगळवारपासून खेळविली जात आहे. इंडिया खुली सुपर 750 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विद्यमान विजेता लक्ष्य सेन, दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांच्या कामगिरीवरच यजमान भारताची भिस्त राहील. या स्पर्धेमध्ये विविध देशांचे अव्वल स्पर्धक सहभागी होत आहेत.
चालू वर्षाच्या बॅडमिंटन हंगामातील पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा मलेशियामध्ये यापूर्वी झाली. आता दिल्लीत होणाऱया इंडिया खुल्या सुपर 750 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी एकूण 9 लाख डॉलर्स बक्षिसाची रक्कम ठेवण्यात आली आहे. विश्व बॅडमिंटन फेडरेशनने या स्पर्धेच्या दर्जाला बढती दिली आहे. यापूर्वी ही स्पर्धा सुपर 500 दर्जाची खेळविली जात होती. पण आता ती 750 दर्जाची राहणार आहे. जागतिक पुरुष आणि महिला बॅडमिंटनपटूंच्या मानांकन यादीतील आघाडीचे दहा बॅडमिंटनपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामध्ये सातवी मानांकित पी. व्ही. सिंधू, दहावा मानांकित लक्ष्य सेन आणि आठवा मानांकित एच. एस. प्रणॉय एकेरीत खेळणार आहेत. पुरुष दुहेरीच्या मानांकनातील पाचव्या स्थानावरील भारतीय जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या स्पर्धेत जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत. पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन हे या स्पर्धेतील माजी विजेते असून पुन्हा ते जेतेपदासाठी फेव्हरीट म्हणून ओळखले जातात. तेरावा मानांकित किदाम्बी श्रीकांतने यापूर्वी एकदा या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.
2022 च्या बॅडमिंटन हंगामात विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये लक्ष्य सेन आणि एच. एस. प्रणॉय यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना समाधानकारक कामगिरी केली होती. गेल्या आठवडय़ात कौलालंपूर येथे झालेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन तसेच एच. एस. प्रणॉय यांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याचप्रमाणे दुखापतीमुळे बराच कालावधी बॅडमिंटन क्षेत्रापासून अलिप्त राहिलेली पी. व्ही. सिंधू मलेशियन बॅडमिंटन स्पर्धेत फारशी मजल मारू शकली नाही. स्पेनची टॉप सीडेड कॅरोलिना मॅरीनलाही गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने गुडघा दुखापतीची समस्या जाणवत आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा पहिल्या फेरीतील सामना थायलंडच्या सुपिंदा कॅटेथाँगशी होणार आहे. गेल्या इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला कॅटेथाँगकडून पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागल्याने यावेळी सिंधू अधिक सावध राहील. माजी विश्वविजेती पी. व्ही. सिंधूला गेल्या ऑगस्ट महिन्यात राष्ट्रकुल स्पर्धेत खेळताना टाचेला दुखापत झाली होती. ही दुखापत लवकर बरी झाली नाही. त्यामुळे तिला काही महत्त्वाच्या स्पर्धांना मुकावे लागले होते. मंगळवारपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला कदाचित उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन युफेईशी लढत द्यावी लागेल.
सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने गेल्या आठवडय़ात झालेल्या सुपर 1000 दर्जाच्या मलेशियन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. त्यांचा या स्पर्धेतील सलामीचा सामना डेन्मार्कच्या बे आणि मॉलहिडेशी होणार आहे. पुरुष एकेरीत भारताचा माजी टॉप सीडेड किदाम्बी श्रीकांतचा सलामीचा सामना स्वीडनच्या माजी ऑलिम्पिक आणि दोन वेळा विश्वविजेतेपद मिळणाऱया व्हिक्टर ऍक्सलसनशी होणार आहे. व्हिक्टर ऍक्सलसनने रविवारी मलेशियन बॅडम्ंिांटन स्पर्धा जिंकली असल्याने तो पुन्हा नव्या जोमाने या स्पर्धेत जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. महिलांच्या विभागात भारताची लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती सायना नेहवालचा सलामीचा सामना डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टशी होणार आहे. महिला दुहेरीत भारताच्या मालविका बनसोड आणि आकषी काश्यप यांचा सलामीचा सामना थायलंडच्या बुसानेन आणि झेंग यांच्याशी होणार आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत बॅडमिंटन क्षेत्रातील नवीन पिढीतील नवोदित बॅडमिंटनपटू जपानचे कोदाई नाराओका, मलेशियाचे लि झिया तसेच माजी विश्वविजेते लोह किन येवे आणि थायलंडचे व्हीटीसॅम यांच्या कामगिरीवर शौकिनांचे लक्ष राहील. जपानच्या अकेनी यामागुचीने 2022 च्या बॅडमिंटन हंगामात एकूण चार स्पर्धा जिंकल्या असून त्यामध्ये अखिल इंग्लंड, विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीप, तसेच विश्व टूर फायनल्स आणि त्यानंतर मलेशियातील स्पर्धेचा समावेश आहे.









