वृत्तसंस्था/ व्हॅनेटा (फिनलँड)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या आर्टिक खुल्या 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दरम्यान या स्पर्धेत पुरुष विभागात किदांबी श्रीकांत तसेच किरण जॉर्ज, तनीषा क्रेस्टो आणि अश्विनी पोनाप्पा यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
या स्पर्धेतील झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने चीन तैपेईच्या वेन हेसूचा 21-11, 21-10 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. सिंधूचा हेसूवरील हा तिसरा विजय आहे. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना व्हिएतनामच्या नेगुयेनशी होणार आहे.
महिला दुहेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या लॅम्बर्ट आणि ट्रेन यांनी भारताच्या तनिषा क्रेस्टो आणि अश्विनी पोनाप्पा यांचा 21-19, 21-16 असा पराभव केला. त्dयानंतर महिला एकेरीच्या सामन्यात चीनच्या वेंग यी हिने भारताच्या आकर्षी काश्यपचा पराभव पुढील फेरीत स्थान मिळवले. त्याचप्रमाणे चीनच्या चौथ्या मानांकित लु झू ने किरण जॉर्जवर 21-10, 22-20 अशी मात केली. पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात जपानच्या कांता सुनेयामाने किदांबी श्रीकांतचे आव्हान 21-15, 21-12 असे संपुष्टात आणले. सदर स्पर्धा 15 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे









