सांगली / संजय गायकवाड :
मध्यवर्ती बसस्थानक ते सिव्हिल हॉस्पिटल यांना जोडणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता आणि या रस्त्याला क्रॉस असणारा डॉ.पी.आर. पाटील मार्ग हा अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे. आंबेडकर मार्गावर गेल्या दोन महिन्यात अपघातात दोघांचा बळी जावूनही महापालिकेचे या मार्गाकडे दुर्लक्ष झाले आहे. पी. आर. पाटील, डॉ. आंबेडकर मार्गावर अनेक अतिक्रमणे असताना मनपा प्रशासनाकडून येथील अतिक्रमणांना अप्रत्यक्ष अभय देण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे.
सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या स्थापनेनंतर गेल्या सत्तावीस वर्षात अपवाद वगळता पालिका क्षेत्रातील रस्ते आणि चौकांचे रूंदीकरण झालेले नाही. मनपा क्षेत्रातील सांगली, हे जिल्हयाचे मुख्यालय आहे. येथे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका मुख्यालय, जिल्हा कारागृह, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वसंतदादा मार्केट यार्ड, विष्णूअण्णा फळ मार्केट, मध्यवर्ती बसस्थानक, सांगली शहर बसस्थानक, अप्पर तहसिलदार कार्यालय यासह शाळा कॉलेज, रेल्वेस्टेशन यामुळे सांगलीत दिवसभर मोठी गर्दी असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड हा सांगलीचे मध्यवर्ती बसस्थानक ते सिव्हिल हॉस्पिटल यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याला बसस्थानकापासून खणभाग, मद्रासी कॉलनी, क्रांती क्लिनिक रस्ता, पी.आर.पाटील मार्ग, गणेशनगर रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर रस्ता, सम्राट व्यायाम मंडळ कॉर्नर रस्त, संजोग कॉलनी रस्ता आणि पुढे सिव्हिल हॉस्पिटल असे अनेक चौक व रस्ते क्रॉस होतात.
यामुळे मध्यवर्ती बसस्थानकापासून सिव्हिल पर्यंत विनाअपघात एखादे वाहन वा व्यक्ती सुरक्षितपणे जाईल याची हमी कोणीच देवू शकत नाही. पुर्वी स्टेशन रस्त्यावरून एसटी बसेस ये जा करत होत्या. आता तासगाव, विटा, आटपाडीसह, सोलापूर आणि कर्नाटककडून येणाऱ्या सर्व एसटी बसेस या सिव्हिल मार्गे मध्यवर्ती बसस्थानकाकडे जात असतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याला क्रॉस असणाऱ्या रस्त्यांपैकी डॉ.पी.आर. पाटील मार्ग हा सर्वात गर्दीचा आणि वाहनांची ये जा असणारा मार्ग आहे. शामरावनगर, कत्तलखाना परिसर, गणेशनगर आणि शंभर फुटी रस्त्याकडून सांगली शहरात येणारे सर्व वाहनचालक हे पी. आर. पाटील मार्गाने एक तर समोर शांतिनगर व तेथून खणभागाकडे जातात. तर बहुतांश वाहनचालक हे या चौकातून बसस्थानकाकडे वळून पुढे जातात. पण पी. आर. पाटील मार्गाकडून सिव्हिलकडे वळणाऱ्या वाहनांना वळताना मोठी अडचण होते. पी.आर. पाटील मार्गाने शामरावनगरकडून येणारे अनेक वाहनचालक हे आंबेडकर रस्त्यावरून वाहनांकडे लक्ष न देता भरधावपणे गाडया पुढे नेण्याचा प्रयत्न करतात.
यामुळे या चौकात हमखासपणे अपघात होतात. दोन महिन्याच्या अंतरामध्ये येथे मुंबई जमखंडी एसटी बसखाली सापडून एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. यापाठोपाठ मार्निंग वॉकला गेलेल्या आणखी एका व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला.
मध्यवर्ती बसस्थानकापासून सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत दोन्ही बाजूनी मोठया प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. दोन्ही बाजूनी दुकाने, हातगाडया फेरीवाले यांची गर्दी वाढली आहे. यात पी.आर. पाटील मार्ग चौकाचाही समावेश आहे. दुकानांसमोरील वाढती अतिक्रमणे कायम असताना त्यापुढे दुचाकी आणि चारचाकी गाडया कशाही उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या एसटी बसेससह खासगी आरामगाडया तसेच अन्य अवजड वाहनांना संथ गतीने जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यातूनही येथे अपघात होत आहेत. यातून मग कुणाला तरी आपला जीव गमवावा लागतो. पुन्हा संबधित वाहनचालकांना जमावाकडून बेदम मारहाण, संघटनांचे इशारे आणि पत्रकबाजी यापेक्षा येथे वेगळे काही होत नाही.
मनपा आयुक्त सत्यम गांधी यांनी एसटी मार्गावर हातगाडयांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही असे एक महिन्यापुर्वी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र आंबेडकर रस्त्यावर एसटी बसेसच्या मार्गावर एवढ्या हातगाडया असतात की त्या मनपाला दिसत नाहीत का असा प्रश्न नागरिक आणि वाहनचालकांतून उपस्थित केला जात आहे. मनपा प्रशासनाकडून तातडीने डॉ. आंबेडकर मार्ग आणि डॉ.पी.आर. पाटील चौकासह डॉ. आंबेडकर मार्गावर अतिक्रमण हटावची धडक मोहिम राबवावी अशी मागणी शहरवासियातून होत आहे.








