पृथ्वीचे संरक्षण कवच म्हणून ओळख असलेल्या ओझोन वायूचा थर पूर्ववत होणे, ही संपूर्ण जगासाठी आनंददायक व दिलासादायक बाब म्हटली पाहिजे. प्रदूषणामुळे आणि वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढत असल्याने ओझोन वायूच्या प्रमाणात मागच्या काही वर्षांत मोठी घट झाली होती. पण, आता यात सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजेच 2050 पर्यंत ओझोनचा थर 1980 च्या पातळीपर्यंत परत येण्याच्या मार्गावर असल्याचे जागतिक हवामान संघटना अर्थात डब्लूएमओने आपल्या अहवालात म्हटले आहे. जागतिक हवामान दिनाचे निमित्त साधून डब्लूएमओकडून प्रसिद्ध करण्यात आलेला हा अहवाल अनेकार्थांनी महत्त्वाचा म्हटला पाहिजे. खरे तर ओझोन थराच्या संरक्षणासाठी 1985 मध्ये व्हिएन्ना येथे एक परिषद घेण्यात आली होती. या परिषदेच्या माध्यमातून जगभरातील सर्व देश ओझोनला वाचविण्यात एकत्र आले. ओझोनचे संरक्षण कसे करता येईल, संभाव्य धोके कसे टाळता येतील, पुढच्या काळात ओझोन थराचे नुकसान टाळण्यासाठी काय काय करता येईल, यावर या परिषदेत अतिशय गांभीर्यपूर्वक चर्चा झाली. केवळ चर्चाच झाली, असे नव्हे, तर कृती कार्यक्रमही निश्चित करण्यात आला. ओझोनच्या संरक्षणासाठी एक प्रेमवर्क म्हणजेच चौकट वा आचारसंहिता तयार करण्यात आली. ही आचारसंहिता म्हणजेच मॉन्ट्रियल करार होय. याअंतर्गत ओझोन क्षीण करणाऱ्या पदार्थांचे उत्पादन व वापर टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे वा बंद करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर यासंदर्भातील संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यास प्रोत्साहन देण्याची भूमिका घेण्यात आली. हायड्रोक्लोरोकार्बन, हॅलन्स, कार्बन टेट्राक्लोराईड व इतर काही पदार्थांमुळे ओझोनचा थर क्षीण होत असल्याचे मानले जाते. स्वाभाविकच वातावरणात पसरलेले हे घटक कसे कमी करता येतील, यावर विविध राष्ट्रांनी भर दिला. नियंत्रित उपयोजनांसाठी उत्पादन आणि वापरासाठी हायड्रोक्लोरोकार्बनचे 67.5 टक्के उत्पादन बंद करण्याचे लक्ष्य भारताने बाळगले होते. मॉन्ट्रियल कराराच्या अंतिम मुदतीपूर्वच हे लक्ष्य यशस्वीरीत्या देशाने साध्य केल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय करारामुळे जगभरातून ओझोन थर कमी करणारे 99 टक्के पदार्थ बाद करण्यात आले आहेत. त्यामुळेच ओझोन थर सुधारण्यास मदत झाली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. हे बघता भारतासह ओझोन संरक्षणासाठी ठोस पावले उचलणाऱ्या सर्व देशांचे अभिनंदन केले पाहिजे. ओझोनचा थर सजीवसृष्टीकरिता ऑक्सिजनइतकाच महत्त्वाचा आहे. सूर्यप्रकाश सर्वच सजीवमात्रांकरिता गरजेचा होय. परंतु, सूर्याच्या अतिनील किरणांमुळे सजीवांना धोका निर्माण होऊ शकतो. या अतिनील किरणांपासून सजीवसृष्टीचे संरक्षण करण्याची तरतूद निसर्गानेच केली आहे. पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन वायूचा थरच या अतिनील किरणांपासून सजीवांचे रक्षण करतो. एखाद्या संरक्षण कवचाप्रमाणे हा वायू काम करतो. सजीवांचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 15 ते 35 किमीवर असलेल्या ओझोनच्या थराशिवाय दुसरा पर्याय नाही. हा वायू बाधित झाला, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. वनस्पती, झाडे मरतीलच. शिवाय माणसे व इतर प्राण्यांमधील डीएनए नष्ट होऊन अन्नसाखळी तुटेल व जीवसृष्टीच संपेल, अशी भीती शास्त्रज्ञ व्यक्त करतात. याचा विचार करता ओझोन किती आणि कसा महत्त्वाचा आहे, हे आपण समजू शकतो. त्यामुळे ओझोन पूर्ववत स्थितीमध्ये येणे ही पुनऊज्जीवनापेक्षा कमी नाही. खरे तर ओझोनचा थर हा ऑक्सिजनच्या तीन अणूंचा समावेश असलेला वायू आहे. या थराचा शोध फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ प्रॅब्री चार्ल्स आणि हेन्री बुसन यांनी 1913 मध्ये लावल्याचे सांगण्यात येते. स्ट्रॅटोस्फियरचा थर म्हणून तो ओळखला जातो. 1970 च्या उत्तरार्धात ओझोनच्या थराला छिद्र असल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात आला होता. यानंतर 80 च्या दशकात या समस्येवर विचार करण्यास खऱ्या अर्थाने सुऊवात झाली. त्यानंतर व्हिएन्नाची ऐतिहासिक परिषद झाली. तर 1994 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 16 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून ओझोन या विषयावर ज्या पद्धतीने जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती झाली, ती ऐsतिहासिकच म्हटली पाहिजे. माणसाने ठरवले, तर तो काय करू शकतो, हेच यातून दिसून येते. यापुढेही हाच कृती कार्यक्रम कायम ठेऊन जगातील सर्व राष्ट्रांनी ओझोन संरक्षणाचा हा वसा कायम ठेवला पाहिजे. त्यातूनच ओझोन खऱ्या अर्थाने प्रदूषणापासून मुक्त व निर्धोक होऊ शकेल. मागच्या काही वर्षांत ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाचीही सर्व जगाला झळ बसली आहे. हरितवायू उत्सर्जनामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यातून आज वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात. ढगफुटी, अतिवृष्टी, उष्णतेच्या वा थंडीच्या लाटा, बर्फ वा हिमनद्या वितळणे, अवर्षण हे सारे ग्लोबल वॉर्मिंगमधून निर्माण झालेले प्रश्न आहेत. अलीकडच्या दोन ते तीन वर्षांत अनेक देशांवर ढगफुटीचे संकट कोसळल्याचे दिसून आले. या पावसाने अनेक शहरे, तेथील नियोजन व्यवस्था कोलमडून पडण्याबरोबरच अनेकांचा बळी गेल्याचीही उदाहरणे आहेत. भविष्यात हा धोका अधिकच वाढण्याचा धोका संभवतो. हे पाहता ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटापासून बचाव करण्याकरिताही आपल्याला गंभीरपणे पावले उचलावी लागतील. अर्थात या विषयावरही पॅरिस परिषदेत बराच खल झाला होता. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनाच्या समस्येवर मात करण्यासाठी एक दिशाही ठरविण्यात आली होती. तथापि, अद्याप यादृष्टीने म्हणावी तशी पावले पडलेली नाहीत. ओझोन रिटर्न्सकरिता जी एकी व मानसिकता जगाने दाखवली, तोच दृष्टीकोन ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाबाबत दाखवावा लागेल. तरच यश मिळू शकेल.








