हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कंपनी : आर्थिक वर्ष 2025 मध्ये दमदार नफा
वृत्तसंस्था/ चेन्नई
हॉस्पिटल क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या ओयो यांना आयपीओ दाखल करण्यासाठी संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. हॉस्पिटलिटी चेन क्षेत्रातील ओयो आपला आयपीओ सादर करणार असून या संदर्भातल्या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिलेली आहे. पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीने चांगली कामगिरी केलेली असून या बळावरच कंपनीने आयपीओ सादर करण्याचे निश्चित केलेले आहे. ओयोच्या संचालक मंडळात संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल यांच्यासोबत स्टारबक्सचे माजी सीओओ ट्रॉय अल्स्टेड, अमेरिकन अकाउंटिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष डब्ल्यू स्टीव्ह अल्ब्रेक्ट, इंडिगोचे सहसंस्थापक आदित्य घोष, सॉफ्ट बँकेचे व्यवस्थापकीय भागीदार सुमेर जुनेजा आणि लाईटस्पीड वेंचर्सचे भागीदार बेजुल सोमय्या यांचा समावेश आहे.
1100 कोटीचा नफा
आर्थिक वर्ष 2025 मध्ये ओयोने जवळपास 1100 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. ओयोचे संभाव्य बाजारमूल्य 7 ते 8 अब्ज डॉलर्सवर पोहोचू शकते. आयपीओ संदर्भात ओयोने गोल्डमॅन सॅक्स, सिटी, जेफरीज आणि अॅक्सिस कॅपिटल यांच्यासह 5 गुंतवणूक बँकांशी चर्चा केली आहे. मेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सॉफ्ट बँकेची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचेही कंपनी म्हटले आहे.









