प्रतिनिधी/ नवी दिल्ली
सॉफ्टबँक-समर्थित हॉस्पिटॅलिटी कंपनी ओयोची सूचीद्वारे विकल्या जाणाऱ्या समभागांची संख्या कमी करण्याची योजना आहे. कमी भांडवलाची गरज आणि तांत्रिक आव्हाने लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
संस्थापक रितेश अग्रवाल हे कंपनीचा आयपीओ पुढे ढकलत असून हॉटेल व लॉजिंग व्यवसायावरील दबावामुळे असा निर्णय घ्यावा लागतो आहे. कोरोनानंतर हॉटेल व लॉजिंग व्यवसाय पूर्वपदावर येतो आहे.
दरम्यान, रितेश अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, ओयोचा आर्थिक वर्ष 23 साठी महसूल 5,700 कोटी रुपये अपेक्षित आहे, जो मागील आर्थिक वर्षातील 4,780 कोटी रुपयांच्या तुलनेत 19 टक्क्यांनी वाढला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान अग्रवाल यांनी दावा केला की, कंपनी रोखीची मजबूत स्थिती राखण्यासाठी आणि किफायतशीर पद्धतीने कामकाज राखण्यासाठी उपाययोजनांवर भर देत आहे. आमच्याकडे 2,700 कोटी रुपयांची रोख शिल्लक आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही सध्याच्या कामकाजासाठी त्यापेक्षा कमी खर्च करू.’ ते म्हणाले की कंपनीने भारत, इंडोनेशिया आणि अमेरिकेत सातत्यपूर्ण वाढ नोंदवली आहे. आयपीओ लाँच करण्याचा ओयोचा हा दुसरा प्रयत्न आहे. गुरुग्रामस्थित कंपनीने सप्टेंबर 2021 मध्ये 8,430 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी कागदपत्रे देखील सादर केली होती.









