केंद्राच्या राज्यांना सूचना ः आरोग्यविषयक सुविधांमध्ये कमतरता न ठेवण्याचे निर्देश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाचा धोका पाहता केंद्र सरकार सतर्क झाले आहे. याचदरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना आणखी एक पत्र पाठवले आहे. या पत्रात देशात कोरोनाचा वेग सध्या संथ असला तरी येणाऱया आव्हानासाठी आपण आधीच तयार राहायला हवे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑक्सिजनच्या पुरवठय़ात कोणतीही कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना मंत्रालयाने सर्व राज्यांना दिल्या आहेत. तसेच, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन पुरवठा यंत्रे चांगल्या स्थितीत ठेवावीत, असे निर्देश दिले आहेत.
चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱया प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी आवश्यक असेल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी यापूर्वी सांगितले. या देशांतील कोणत्याही प्रवाशाला कोविड-19 ची लक्षणे आढळल्यास किंवा चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास या लोकांना अलग ठेवण्यात येणार आहे.
कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने तीन दिवसांत तीन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ‘टी-3’ म्हणजेच टेस्ट, ट्रक आणि ट्रीट रणनीती अवलंबण्याचा आग्रह धरला. सध्या चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे दररोज 5 हजार मृत्यू होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात दक्षता बाळगली जात आहे.
27 डिसेंबरला रुग्णालयांमध्ये मॉक ड्रील
मांडविया यांनी राज्यांना 27 डिसेंबर रोजी रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधांचे मॉक ड्रील घेण्यास सांगितले आहे. या मोहिमेदरम्यान विशेषतः ऑक्सिजन प्लान्ट आणि व्हेंटिलेटरबाबत राज्यांना अतिदक्ष राहण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे 2020-21 मध्ये या दोन गोष्टींची मोठी कमतरता होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकार ही व्यवस्था मजबूत ठेवण्यावर भर देत आहे.









