एका पिढीचे लहानपण भातुकलीचा खेळ मांडत बाहुल्यांशी रमून जाण्यात, आनंदात स्मरणीय झाले. फार काळापूर्वी स्त्रिया आपल्या लहान मुलींना चिंधीची बाहुली करून देत. ती कापडी बाहुली लहान मुलींचा जीव की प्राण असे. नंतर प्लास्टिक आणि पुढे पाश्चात्य डॉल मुलींच्या भावविश्वात प्रवेश करती झाली. काळ बदलला, मनाला निराळी दिशा लाभली आणि बाहुल्यांचा खेळ नव्या रूपात रंगू लागला. ‘लहान माझी बाहुली, मोठ्ठी तिची साऊली’ हे बालगीत लोकप्रिय झाले. घारे डोळे गरगर फिरवणारी बाहुली दात घासत नाही, तोंड धूत नाही, परंतु स्वयंपाक करते. कसा? तर, ‘भात केला कच्चा झाला, वरण केले पातळ झाले, पोळय़ा केल्या करपून गेल्या, तूप सगळं सांडून गेलं.’ स्वयंपाक बिघडल्याचे बाहुलीला फार वाईट वाटते. त्या बाहुलीमध्ये असलेली घरोघरची अन्नपूर्णा म्हणते, ‘असे भुकेले नक्का जाऊ, थांबा करते गोड खाऊ’. सर्वांना जेवू घालण्याचा स्त्रियांचा संस्कार त्या बाहुलीत उतरतो हे विशेष!
भातुकलीच्या खेळात प्रधान भूमिका करणाऱया बाहुलीची शिकवण भविष्यातल्या सुरेल संसाराची नांदी होती. प्राथमिक शाळेत ‘या बाई या, बघा बघा कशी माझी बसली बया’ ही बाहुलीवरची कविता होती. मनातले सारे कळणारी, हट्ट न धरणारी ही बाहुली होती कशी? ‘शहाणी कशी? साडी-चोळी नवी ठेवी जशीच्या तशी..’ एक अंगावर, एक दांडीवर अशा फक्त दोन साडय़ा असणाऱया त्या काळात स्त्रिया सणासुदीला घालण्यासाठी असलेली जरीची एकमेव साडी जपून जपून वापरत. ती सवय त्यांना जन्मभर पुरत असे. ह्याची रुजवण करणारी बाहुली हा जगण्याचा एक भाग होती. ‘बाहुली’ हे अध्यात्म क्षेत्रात साधना काळात उन्नतीकडे नेणारे प्रभावी माध्यम आहे हे लक्षात आले की मन प्रसन्न होते.
शंभर वर्षांपूर्वी जात्यावर बसून ओव्या गाणाऱया स्त्रियांनी गायिलेली अप्रतिम ओवी आहे–
‘समुद्राच्या काठी विष्णू वाळू मळी बाहुली घडवी ब्रम्हदेव..’
साने गुरुजी याचे स्पष्टीकरण करताना म्हणतात, ‘रोज प्राणीमात्र जन्माला येत आहेत. एखादा कुंभार नदीकाठी मडकी बनवतो, त्याला थोडीशी माती व थोडे पाणी पुरते. परंतु विष्णू समुद्राची न संपणारी वाळू मळतात. समुद्राचे पाणी वापरतात आणि मग त्या मळलेल्या वाळूची ब्रह्मदेव ही बाहुली बनवतो. बाहुली हा शब्द वापरून स्त्रियांनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले. माणसाचा जन्म-मृत्यू, त्यातले मध्यंतर काहीही त्याच्या हातात नाही. माणसाने कधी, कुठे, केव्हा, कुणाच्या पोटी जन्म घ्यावा हे जसे त्याच्या कक्षेत नाही, तसेच मृत्यूही वयाच्या कोणत्या टप्प्यावर कुठल्या स्थळी यावा हे त्याला अज्ञात असते. चौकोन मांडून खेळणाऱया ठिकरीच्या खेळासारखे असते आयुष्य. त्या अदृश्य सूत्रधाराकडून माणसे चौकोनातून ढकलले जातात पुढे पुढे. जन्म एका ठिकाणी, कर्मभूमी दुसरी, तर मृत्यू भलत्या ठिकाणी. कोणाचा हा खेळ? संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘जो अविद्येचिया चिंधिया । गुंडुनि जीव बाहुलीया । खेळवीतसे तिगुणिया । अहंकाररज्जू ।।915।। 18 ईश्वरापासून सर्व प्राणी आकाराला आले. तो ईश्वर अविद्यारूपी चिंध्या गुंडाळून बनवलेल्या जीवरूपी बाहुल्या, त्रिगुणात्मक अहंकाररुपी दोरीने खेळवतो आहे. माऊली म्हणतात, सारे प्राणिमात्र त्रिगुणात्मक कर्माचा खेळ खेळत असतात आणि या खेळाची दोरी त्या परमात्म्याच्या हातात असते. कर्म, प्रारब्ध, संचिताच्या चिंध्या गुंडाळून तो अविश्रांत जीवरूपी बाहुल्या तयार करतो आहे आणि खेळवतो आहे. या कळसूत्री बाहुल्यांचा मालक तो आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथलेखनाच्या सांगतेला ग्रंथाचे सारे श्रेय माऊली गुरू श्री निवृत्तीनाथांना देऊन म्हणतात,
‘सायिखडेयाचे बाहुले, चालवित्या
सूत्राचेनि चाले ।
तैसा माते दावीत बोले,
स्वामी तो माझा’
जो चालवतो त्याच्या सूत्राप्रमाणे कळसूत्री बाहुले चालते. त्याप्रमाणे मला पुढे करून माझे गुरू बोलत आहेत. माझ्या गुरूंनीच या ग्रंथाची रचना केली आहे.
हा परमेश्वर जगात बाहुल्यांचे नाना प्रकारचे खेळ खेळतो. एका निर्जन ठिकाणी कुण्या अभागी माऊलीने आपल्या तान्हुल्याला फेकून दिले. काटय़ाकुटय़ात पडलेल्या त्या बाळाला लाल मुंग्यांनी जागोजागी चावे घेतले. टाहो फोडून रडणारे ते बाळ कुणाच्यातरी सजगतेने बालसंगोपन करणाऱया संकुलात आले. प्रेम, जिव्हाळा व काळजी घेणाऱया मातृहृदयी स्त्रियांमुळे छान गुटगुटीत झाले. एक दिवस बाळासाठी आसुसलेल्या आई-बाबांच्या मांडीवर बसून ते मानसन्मानाने घरी गेले. तो सोहळा काय वर्णावा? आई-वडील, नावगाव, पैशाअडक्मयाशिवाय जन्माला आलेले ते बाळ अकस्मात ऐश्वर्यसंपन्न झाले. मागच्या पिढीची पुण्याई, वारसा, नावआडनावासह विविध प्रकारची नाती एका क्षणात त्याच्याभोवती गुंफली गेली. रंगाने काळं परंतु लोभस असलेलं बाळ सुवर्णालंकार लेऊन झळाळलं. सजवलेल्या मोटारीत बसून हक्काच्या घरी गेलं. कुणीतरी म्हणाले, ‘कालचा रोडपती आजचा करोडपती!’ त्याचा खेळ तो जाणो. रस्त्यावर बसून गोड गळय़ाने गाणे म्हणत भीक मागणारी एखादी स्त्री असते. तिचे भविष्य निमिषात बदलते. ती अचानक प्रसिद्धीच्या झोतात येते, पैसे मिळवते आणि त्याचे सूत्र हलले की पुन्हा त्याच खालावलेल्या परिस्थितीत येऊन पडते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत, ‘श्रीरामांच्या इच्छेत इच्छा मिसळून रहावे. एकदा तुम्ही तुमचा हात माझ्या हातात दिलात की मी तो श्रीरामांच्या हातात नेऊन देतो. पुढे त्याची इच्छा.’
माणसाच्या जगण्याची सूत्रं त्याच्या मनाजवळ असतात. बालपणापासून स्वतःच्या मनाप्रमाणे वागता यावे म्हणून त्याची धडपड असते. परंतु त्याच्या मनाप्रमाणे घडतेच असे नाही. श्रीराम-रावण युद्धामध्ये रावणाचा पराजय झाल्यानंतर रावण शेवटचा घटका मोजत रणांगणावर पडला होता. त्यावेळी श्रीरामांनी लक्ष्मणाला तिथे पाठवले. श्रीरामांच्या आज्ञेनुसार लक्ष्मणाने रावणाला विचारले, ‘आपण महापराक्रमी शिवभक्त म्हणून जगलात. जगाला तुम्हाला काही सांगायचे आहे का?’ रावण म्हणाला, ‘होय. माझी महत्त्वाकांक्षा होती की लंका सुवर्णाची असावी व तिला स्वाभाविक सुगंध असावा. हा खारा समुद्र गोड करावा. परंतु हा देह सोडताना मला पुरते कळले आहे की, जिवाच्या जगण्याला मर्यादा असतात. त्या परमेश्वराच्या मर्जीशिवाय काहीही होऊ शकत नाही. सारी सूत्रं त्याच्या हातातच असतात.’ स्वामी स्वरूपानंदांचा एक अभंग आहे–
‘खेळविसी तैसा खेळेन साचार, तू चि सूत्रधार, बाहुले मी’
तू आमचा धनी आहेस. आम्ही तुझे चाकर आहोत. तुझाच आधार आहे. तू बोलवशील तसे बोलीन. अभिमान तरी कशाचा धरू? कायावाचामने मी तुझ्या पायी लीन आहे. स्वामी माधवानंद म्हणतात, ‘आयुष्याची सूत्रं देवाच्या हातात देणं हे कळायला सोपं असलं तरी वळायला वेळ लागतो.’ त्यासाठी परमेश्वराची इच्छा आणि कळसूत्री बाहुल्यांचा खेळ समजून घ्यायला अध्यात्मसाधना हवी एवढे मात्र खरे.
-स्नेहा शिनखेडे








