प्रतिनिधी/ बेळगाव
उज्ज्वलनगर येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका युवकाला तडीपार करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त व विशेष दंडाधिकारीही असणारे नारायण बरमणी यांनी यासंबंधीचा आदेश दिला आहे. कोप्पळ जिल्ह्यात त्याला तडीपार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
तन्वीर निजमी ऊर्फ अंदा चि•dया (वय 32) राहणार अकरावा क्रॉस उज्ज्वलनगर असे त्याचे नाव आहे. माळमारुती पोलीस स्थानकात तन्वीरवर राऊडी शीट उघडण्यात आली होती. लुटमार, दरोडा, खुनी हल्ल्याचा प्रयत्न, खून, दंगल, सरकारी नोकरांवर हल्ला आदी गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत. माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील रुक्मिणीनगर, अशोकनगर, अंजनेयनगर, उज्ज्वलनगर, न्यू गांधीनगर, अमननगर, मार्केट व खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातही त्याची दादागिरी सुरू होती. सर्वसामान्य नागरिकांना तो धमकावत होता. अनेकवेळा प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत सीआरपीसी कलम 107 अन्वये त्याच्यावर कारवाई करूनही त्याच्यात सुधारणा झाली नव्हती.
तन्वीरवर माळमारुती पोलीस स्थानकात 4, मार्केट पोलीस स्थानकात 4 व खडेबाजार पोलीस स्थानकात 1 असे एकूण 9 गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी पाच गुन्ह्यात न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. एका प्रकरणात त्याची सुटका झाली असून आणखी दोन प्रकरणांचा तपास सुरू आहे. एका प्रकरणात त्याच्याकडून बाँड घेण्यात आला आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्याला तडीपार करण्यासंबंधी मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी प्रस्ताव पाठवला होता. पोलीस उपायुक्तांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करीत त्याला तडीपार केले आहे.









