5 पैकी 4 आमदारांचा राजदमध्ये प्रवेश
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना राजकीय झटका बसला आहे. बिहारमध्ये ओवैसी यांच्या एआयएमआयएम या पक्षात मोठी फूट पडली आहे. ओवैसी यांच्या पक्षाचे 4 आमदार राष्ट्रीय जनता दलात सामील झाले आहेत. बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीच यासंबंधी माहिती दिली आहे. एकप्रकारे बिहारच्या राजकारणात स्वतःच्या पक्षाला स्थान मिळवून देण्याचे ओवैसी यांचे प्रयत्न आता वाया गेल्याचे मानले जात आहे.
तत्पूर्वी बुधवारी दुपारी तेजस्वी यादव यांनी बिहार विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा यांची त्यांच्या कक्षात एआयएमआयएमच्या 4 आमदारांसोबत भेट घेतली. या भेटीदरम्यान अख्तरुल इमान वगळता ओवैसी यांच्या पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. कोचाधामनचे आमदार मोहम्मद इजहार अस्फी, जोकीहाटचे आमदार शाहनवाज आलम, बायसीचे आमदार रुकनुद्दीन अहमद आणि बहादुरगंचे आमदार अनजार नईमी यांनी राजदमध्ये प्रवेश केला आहे.
औवैसी यांच्या पक्षाचे 4 आमदार सामील झाल्याने बिहारमध्ये भाजपला मागे टाकून राजद आता सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राजदचे विधानसभेत आता 79 आमदार असतील तर भाजप 77 आमदारांसह दुसऱया क्रमांकाचा पक्ष ठरणार आहे.
4 आमदारांकडून राजदमध्ये प्रवेश होणार याची कल्पना ओवैसी तसेच भाजप आणि संजदलाही नव्हती अशी चर्चा आहे. पावसाळी अधिवेशनात तेजस्वी यांनी स्वतःच्या आमदारांना अग्निपथ विरोधात भूमिका मांडण्यासाठी सभागृहात पाठवविले आणि दुसरीकडे एआयएमआयएमच्या आमदारांना राजदमध्ये आणण्यास यश मिळविले आहे.
2020 च्या विधानसभा निवडणुकीत राजद 75 आमदारांसह पहिल्या स्थानावरील पक्ष ठरला होता. तर भाजपचे 74 आमदार निवडून आले होते. परंतु विकासशील इन्सान पक्षाचे 3 आमदार सामील झाल्याने भाजपचे बळ 77 वर पोहोचले आहे. एआयएमआयएमचे 4 आमदार सामील झाल्याने राजदचे संख्याबळ आता 80 झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत संजदचे 43, काँग्रेसचे 19 तर एआयएमआयएमचे 5 उमेदवार निवडून आले होते. हम आणि व्हीआयपीचे प्रत्येकी 4 आमदार होते. याचबरोबर माकपचे 3 आणि भाकपचे 2 आणि बसप, लोजपचा प्रत्येकी एक तर एक अपक्ष आमदार आहे. मुजफ्फरपूरमधील बोचहां मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळवत राजदने स्वतःच्या आमदारांची संख्या 76 वर नेली होती. मागील 2 वर्षांमध्ये लोजप, बसप आणि एक अपक्ष आमदार संजदमध्ये सामील झाला आहे. म्हणजेच संजदचे विधानसभेत आता 46 आमदार आहेत.
बहुमतासमीप राजद
बिहारमध्ये बहुमतासाठी सरकार स्थापन करण्यासाठी 122 आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. एआयएमआयएम आमदारांनी प्रवेश केल्याने राजद अन् घटक पक्षांचे संख्याबळ 115 पर्यंत पोहोचू शकते. अशा स्थितीत राजदला बहुमत गाठण्यासाठी अद्याप आणखी 7 आमदारांचा पाठिंबा मिळविण्याची गरज आहे.