वृत्तसंस्था / हैद्राबाद
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचा वायनाड मतदारसंघ सोडावा आणि हैद्राबाद मतदारसंघातून आपल्या विरोधात निवडणूक लढवून जिंकून दाखवावी, असे आव्हान एआयएमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी राहुल गांधी यांना दिले आहे. तेलंगणा राज्यात भारत राष्ट्र समिती, एआयएमआयएम आणि भाजप हे तिन्ही पक्ष मिळून काँग्रेसला पराभूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा दावा गांधी यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून हे विधान ओवैसी यांनी केल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.
तेलंगणात येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भारत राष्ट्र समिती, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशी लढत होणार आहे. या राज्यात के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी पक्षाचा पराभव करु असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. तसेच काँग्रेसला विजयापासून वंचित ठेवण्यासाठी हे तीन्ही पक्ष आतून संगनमत करीत आहेत, असाही आरोप गांधी यांनी जाहीर सभेत केला आहे.
काँग्रेसवर आरोप
बाबरी मशीद पाडविण्यामध्ये काँग्रेसचाही हात होता, असा आरोप ओवैसी यांनी पुन्हा केला. काँग्रेसने मुस्लीमांचे नुकसानच केले आहे. काँग्रेसची धर्मनिरपेक्षता नकली असून या पक्षावर अल्पसंख्याक विश्वास ठेवणार नाहीत. तेलंगणात काँग्रेसचा दारुण पराभव होईल. गांधी यांचे स्वप्न साकार होणार नाही. काँग्रेसची लोकप्रियता कमालीची घसरली आहे, अशी वक्तव्येही त्यांनी केली.









