वृत्तसंस्था / लंडन
इंग्लंड क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटनने कसोटी क्रिकेटमधून बेमुदत कालावधीसाठी ब्रेक घेणार असल्याची घोषणा सोमवारी केली. 31 वर्षीय ओव्हरटनने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत केवळ दोन कसोटी सामने खेळले आहेत. ओव्हल मैदानावर गेल्या जुलै महिन्यात झालेल्या भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व ओव्हरटनने केले होते. भरगच्च क्रिकेट कार्यक्रमामुळे आपल्याला क्रिकेटच्या इतर प्रकारामध्ये चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करता येत नाही तसेच शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत असल्याने आपण बेमुदत कालावधीसाठी कसोटी क्रिकेटमधून ब्रेक घेत असल्याचे ओव्हरटनने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. ओव्हरटनने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत सहा वनडे आणि बारा टी-20 सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. ओव्हरटनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला 2022 मध्ये प्रारंभ झाला. आयपीएल स्पर्धेत त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळ केला होता.









