जीवघेण्या खड्डय़ांमुळे वाहनधारकांना धोका : मनपा, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी उपाययोजना राबविण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
सार्वजनिक बांधकाम खात्याकडून उद्यमबाग औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांच्या विकासाचे आणि गटारींचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. मात्र, ज्ञान प्रबोधन शाळा आणि सुमेदनगरकडे जाणाऱया रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथील खड्डेमय रस्त्यावरून जीव धोक्मयात घालून विद्यार्थ्यांना ने-आण करण्याची वेळ पालकांवर आली आहे. त्यामुळे येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. याकरिता 57 कोटी निधींची तरतूद केली असून निविदा काढण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी रस्त्यांच्या डांबरीकरणासह गटारींचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दैना झाली असून वाहनधारकांसह उद्योजक, कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
मनपाकडून निधी नसल्याचे कारण
औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांच्या विकासासाठी महापालिकेकडे अनेकवेळा निवेदने देण्यात आली होती. औद्योगिक वसाहतीमधील मालमत्ता कर महापालिकेकडून वसूल केला जातो. मात्र, विकासकामे राबविण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे याबाबत मनपाकडे तक्रारी केल्या होत्या. पण निधी नसल्याचे कारण देऊन महापालिकेने औद्योगिक वसाहतीच्या विकासाकडे दुर्लक्ष केले होते.
मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीमधील विकासकामे करण्यात येत आहेत. पण ज्ञान प्रबोधन शाळेकडे व सुमेदनगरकडे जाणाऱया रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. हा रस्ता पूर्णपणे निकामी बनला असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर खड्डे आणि चिखल असल्याने दुचाकी वाहनधारकांना ये-जा करणे कठीण बनत आहे.
एक फूटहून अधिक खोल खड्डे
पावसामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात घडत आहेत. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून एक फूटहून अधिक खोल खड्डय़ांमधून वाहने चालविताना वाहनधारकांना जीव धोक्मयात घालावा लागत आहे. शाळेला ये-जा करणाऱया पालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुलांना रस्त्यावरून जाताना कसरत करण्याची वेळ आली आहे. याच्या दुरुस्तीसाठी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.