बीआरओ अधिकाऱ्याचा दावा : 90 प्रकल्पांची पूर्तता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीमावर्ती भागांमध्ये रस्तेजाळ्याची निर्मिती आणि त्यांची देखभाल करणारी सीमा रस्ते संघटना म्हणजेच बीआरओच्या प्रमुखाने अत्यंत मोठा दावा केला आहे. सीमांवरील मूलभूत सुविधांच्या विकासात भारत लवकरच चीनला मागे टाकणार असल्याचे बीआरओ प्रमुखांनी म्हटले आहे. लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील मूलभूत सुविधांच्या प्रकल्पांची माहिती दिली आहे.
भारत आगामी 2-3 वर्षांमध्ये सीमेवर मूलभूत सुविधांप्रकरणी चीनवर मात करण्याची क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यरत असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे 10 सीमावर्ती राज्ये अन् केंद्रशासित प्रदेशांमधील 2,941 कोटी रुपयांच्या निधीतून बीआरओकडून तयार करण्यात आलेल्या 90 प्रकल्पांचे उद्घाटन पुढील आठवड्यात केले जाणार आहे.
90 प्रकल्प 12 सप्टेंबर रोजी देशाला समर्पित केले जाणार आहेत. यातील 26 प्रकल्प लडाखमध्ये तर 36 प्रकल्प अरुणाचल प्रदेशमध्ये आहेत. याचमुळे आमचे पूर्ण लक्ष याच दोन राज्यांवर असून आम्ही या दोन्ही ठिकाणी अत्यंत जलदपणे वाटचाल करत आहोत. पुढील 2-3 वर्षांमध्ये लडाख अन् अरुणाचल प्रदेशमधील मूलभूत सुविधा प्रकल्प चीनवर मात करणारे असतील. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून 22 रस्ते, 63 पूल आणि अरुणाचल प्रदेशमधील एक भुयारी मार्ग तसच दोन रणनीतिक विमानतळांचे उद्घाटन पेले जाणार असल्याचे लेफ्टनंट जनरल चौधरी यांनी सांगितले आहे.
सीमावर्ती क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प पूर्ण केले जात असल्याने देशासाठी निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. आमच्या सैन्याच्या संरक्षणक्षमतेला या प्रकल्पांमुळे मजबुती मिळणार असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे पूर्व लडाखमधील न्योमामध्ये एका एअरफील्डच्या कामाचा शुभारंभ करणार आहेत. या प्रकल्पाकरता 218 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 13,400 फुटांच्या उंचीवर असलेल्या न्योमापासून चीनला लागून असलेली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा केवळ 46 किलोमीटर अंतरावर आहे.









