मातीचे ढिगारे हटविण्याची स्थानिकांची मागणी
प्रतिनिधी / फोंडा
उंडीर–बांदोडा येथे खाजन शेतजमिनीत बेकायदेशीररित्या मातीचा भराव टाकण्यात येत असून स्थानिकांना याचा सुगावा लागताच मंगळवारी हा प्रकार बंद पाडण्यात आला. तसेच भराव टाकलेल्या जागेतील माती पुन्हा उचलून शेतजमीन पूर्वस्थितीत न आणल्यास नगरनियोजन खात्याकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार एका देवस्थानच्या आवारात सुरु असलेल्या बांधकामाची माती उंडीर येथील खाजन शेतीमध्ये टाकण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. यासंबंधी रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रेमानंद गावडे व उंडीर दहाजण समाज समितीच्या सदस्यांकडून संबंधीत देवस्थान समितीकडे चौकशी करण्यात आली. देवस्थान समितीने या प्रकारात आपला कुठलाच सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच देवस्थान समितीच्या व्यवस्थापकांनी अशाप्रकारे शेतजमीनीत भराव टाकणे योग्य नसल्याचे सांगितले. मातीचा भराव खाजन शेतीत टाकल्यास येथील खारफुटीची झाडे नष्ट होतील. स्थानिक मच्छीमारांचा व्यावसायही अडचणीत येणार असल्याचे प्रेमानंद गावडे यांनी सांगितले. संबंधीत कंत्राटदाराला स्थानिकांनी जाब विचारला असता मलनिस्सारण विभागाच्या अभियंत्यांच्या आदेशावरुन हा मातीचा भराव टाकण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. उंडीर गावात मलनिस्सारण प्रक्रीया प्रकल्पासाठी हा खटाटोप चालल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दहाजण समाज समितीचे अध्यक्ष मुकुंद नाईक यांनी देवसथान समितीला अंधारात ठेवून कंत्राटदार परस्पर खाजन शेतीत मातीचा भराव टाकत असल्याचा आरोप केला आहे. गावातील शेतजमिन बुजविण्यास स्थानिकांचा प्रखर विरोध असून यापुढे असे प्रयत्न झाल्यास ग्रामस्थ एकत्र येऊन तो हाणून पाडतील. सध्या शेतजमिनीत टाकलेल्या भरावाची माती लवकरात लवकर उचलून खाजनशेती पूर्व स्थितीत आणावी अन्याथा नगरनियोजन खात्याकडे तक्रार केली जाईल असा इशारा मुकुंद नाईक यांनी दिला आहे.









