सुधाकर काशीद,कोल्हापूर
शाहूपुरी रेल्वे फाटक सोमवारी रेल्वेने बंद केल रेल्वे रुळावरून होणारी पादचाऱ्यांची बेकायदेशीर ये-जा जरूर थांबली. फाटकाच्या दोन्ही बाजूला रेल्वेने भिंतच घातली.अर्थातच पर्याय म्हणून जवळचा एकमेव मार्ग असलेल्या परिख पुलाखालून लोकांनी ये-जा सुरू केली.पण रेल्वेच्या म्हणण्यानुसार परिख पुला खालून पादचाऱ्यांनी सोडाच पण वाहनधारकांनी जाणेही बेकायदेशीर आहे.काही दुर्घटना घडली तर आम्ही जबाबदार नाही असे रेल्वेने जाहीर केले आहे. त्यामुळे आता ओव्हर ब्रिजची उभारणी हाच एकमेव पर्याय आहे.आणि ब्रिज जेव्हा उभारला जाईल तेव्हा जाईल.पण तोवर पादचाऱ्यांनी कोठून येजा करायची याचे उत्तर अवघड होऊन बसले आहे.
शाहूपुरी रेल्वे फाटक हे रेल्वेचे सर्वात जुने पहिले रेल्वे फाटक आहे. जेव्हा कोल्हापूर रेल्वे स्थानकातून हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या रेल्वेची ये जा होती. तेव्हा हे फाटक योग्य होते.एसटी स्टँडकडून शाहूपुरी ,पाच बंगला लॉ कॉलेज,राजारामपुरीकडे जाण्यासाठी व येण्यासाठी हा मार्ग नक्कीच उपयोगाचा होता.
अलीकडच्या काळात रेल्वे स्थानकातून येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेची संख्या वाढली आहे. प्लॅटफॉर्म ची लांबी वाढली आहे. आणि प्लॅटफॉर्म रेल्वे फाटकापर्यंत येऊन भिडला आहे. मात्र त्यातूनही पादचाऱ्यांची येजा होतच राहिली रेल्वेने ही ये जा थांबवण्यासाठी कारवाईचाही अधेमध्ये पवित्रा घेतला.अडथळे तयार केले.पण पर्याय नसल्याने रेल्वे फटकावरची अडथळ्याची शर्यत लोक रोज पार करतच राहिले.
काल मात्र रेल्वेने रेल्वे फाटक पूर्ण बंद केले.वास्तविक अपघात टाळण्यासाठी रेल्वे फाटक बंद करणे हा योग्य निर्णय आहे.पण फाटक बंद करण्याआधी ओव्हर ब्रिज उभा करायला हवा होता.पण ओवर ब्रिज आज पर्यंत केवळ चर्चेच्या हवेतच आहे.व ओव्हर ब्रिज सुविधा नसताना फाटक मात्र पूर्णपणे बंद केले गेले आहे.फाटक बंद झाल्याने लोकांनी बाबुभाई परीख पुलाखालून येणे जाणे सुरू केले आहे. वास्तविक या पुला खालून जाणे रेल्वेच्या नियमावलीनुसार बेकायदेशीर आहे. तो पावसाचे पाणी वाहून नेण्याचा मार्ग आहे. तो कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीचा मार्ग नाही हे रेल्वेने वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्या काय झाले तर रेल्वे हात वर करायला मोकळी आहे.

वास्तविक रेल्वे फाटक केव्हा ना केव्हा बंद होणार हे स्पष्टच होते.त्यामुळे ओव्हर ब्रिज उभारणे आवश्यक होते.ब्रिजसाठी रेल्वेचा पन्नास टक्के व राज्य शासन महापालिका यांचा पन्नास टक्के वाटा असे समीकरण आहे.ते समीकरण जुळवून कोण आणणार हाच या क्षणाचा खरा प्रश्न आहे.पण तोवर पादच्रायांना एक तर बाबुभाई परीख हा पूल बेकायदेशीर मार्गच वापरावा लागणार आहे.आणि चुकून तेथे अपघात झाल्यास या बेकायदेशीर मार्गाचा वापर का केला म्हणून त्याला विम्याचे संरक्षण मिळणेही कठीण होणार आहे.त्यामुळे फार चर्चा न करता पावसाळ्यापूर्वी ओव्हर ब्रिजच्या उभारणीला सुरुवात करणे हाच एकमेव मार्ग आहे.
परिख पूल
खूप जुना आहे. तो भक्कम व्हावा यासाठी असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स तीन वर्ष पाठपुरावा करत आहे. ओव्हर ब्रिजचा कमी खर्चाचा आराखडाही आम्ही तयार करून दिला आहे. लोकांच्या सोयीसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही व बाबुभाई परीख पूल बचाव समिती सतत प्रयत्न करत आहोत. पण आता रेल्वे फाटक बंद झाले आहे. त्यामुळे शासन यंत्रणा, कोल्हापूर महापालिका व रेल्वेने तातडीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
अजय कोराणे,अध्यक्ष अर्किटेक्ट असो.









