वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्मितीमधील कंपनी हिरो मोटोकॉर्पच्या हार्ले डेव्हीडसन एक्स 440 साठी आतापर्यंत जवळपास 25,597 जणांनी बुकिंग केले आहे. कंपनीने दिनांक चार जुलै 2023 पासून या गाडीकरीता बुकिंग सुरु केले होते. तथापि हे बुकिंग आता थांबवण्यात आले आहे. यानंतर नव्याने बुकिंग सुरु करण्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
हिरो मोटोकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरंजन गुप्ता म्हणाले की, या सेगमेंटमध्ये हिरोमोटोने दाखल केलेल्या नव्या बाईकला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून खूप आनंद वाटतो आहे. त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या टॉप मॉडेल्सकरीता बुकिंगचे प्रमाण वाढत आहे. ग्राहक योग्य ब्रँड व योग्य मॉडेल्ससाठी अधिक पैसे खर्च करण्यास तयार असतात, हे नक्कीच यावरुन दिसून येत असल्याचे ते म्हणाले.
उत्पादन सप्टेंबर 2023 पासून
हिरोमोटोने सांगितले की ते हार्ले हेव्हीडसन एक्स 440 चे उत्पादन सप्टेंबर 2023 सुरु केले जाणार असून ऑक्टोबरपासून ग्राहकांना या गाडीचे वितरण करण्यात येणार आहे. सदरच्या गाडीच्या सुरुवातीच्या किंमतीत बदल करण्यात आला असून डेनिम, व्हिव्हिड आणि एस प्रकारांच्या सुधारीत किंमती 2,39,500 रुपये, 2,59,500 इतक्या राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.









