पगार देऊन तरुणाईला लावले कामाला : दर्जेदार कामाबाबत साशंकता
बेळगाव : सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाचे काम लवकरच उरकण्यासाठी आता शिक्षकांनी नवीन शक्कल लढविली आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत शिक्षण घेत असलेल्या तरुणांनाही सर्वेक्षणाच्या कामाला लावले आहे. काहींनी तर पगार देऊन काही तरुणांना सर्वेक्षणासाठी नेमल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे सर्वेक्षण योग्यरितीने होईल का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य सरकारने 22 सप्टेंबरपासून राज्यात सर्वत्र सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. सुरुवातीला याची जबाबदारी प्राथमिक शाळांमधील सरकारी शिक्षकांना देण्यात आली होती.
परंतु, अत्यंत धीम्या गतीने सर्वेक्षण होत असल्याने त्यामध्ये हायस्कूल शिक्षक तसेच इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनाही जुंपण्यात आले. सर्व्हरची समस्या, डेटा नॉट फाऊंड, घरांची माहिती मिळत नसल्याने शिक्षक वैतागले आहेत. तसेच एकाच ओळीने सर्वेक्षण न होता हेस्कॉमने लावलेल्या स्टीकरप्रमाणे सर्वेक्षण करावे लागत आहे. एका दिवसामध्ये केवळ चार ते सहा घरांचे सर्वेक्षण होत असल्याने वेळ अपुरा पडत आहे. यासाठीच काही शिक्षकांनी नवीन शक्कल लढविली आहे. सध्या शाळा महाविद्यालयांना दसऱ्याची सुटी असल्याने शिक्षकांनी आपल्या कुटुंबीयांनाच सर्वेक्षणाच्या कामाला लावले आहे.
संबंधित शिक्षक सर्वेक्षण करेपर्यंत पुढील घर शोधून तेथील आधारक्रमांक व इतर माहिती कुटुंबीय जमा करीत आहेत. बऱ्याच ठिकाणी शिक्षकांचा मुलगा, मुलगी, मेहुणा, भाचा यासह इतरांना सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ तसेच वैद्यकीय समस्येने ग्रस्त असलेल्या शिक्षकांकडून सर्वेक्षणासाठी काही युवकांना पगार देऊन नेमण्यात आले आहे. अपार्टमेंटमध्ये जाऊन तेथील माहिती घेणे शिक्षकांसाठी डोकेदुखीचे ठरत असल्याने अशाप्रकारे तरुणांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु, त्यातून सरकारचा उद्देश पूर्ण होईल का? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.









