राहुल गांधींच्या नेतृत्वात लढणार, 50 टक्के महत्त्वाची पदे युवा नेत्यांना
@ उदयपूर / वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँगेसने आपली योजना तयार केली आहे. ही निवडणूक राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लढली जाणार असून पक्षामध्ये महत्वाच्या 50 टक्के पदांवर युवा नेत्यांना आणले जाणार आहे. शेतकऱयांना किमान आधारभूत मूल्य आणि जातीच्या आधारावर लोकसंख्या गणना या दोन मुद्दय़ांवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
उदयपूर येथे शुक्रवारपासून काँगेसचे तीन दिवसांचे चिंतनशिबीर सुरु झाले आहे. या शिबीरात ही योजना तयार करण्यात आली आहे. ऑगस्ट पर्यंत काँगेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. राहुल गांधी यांच्याकडेच अध्यक्षपदाची धुरा सोपविली जाईल, हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांच्याच नेतृत्वात काँगेस निवडणूक लढविणार हे देखील आता स्पष्ट झाले आहे.
नेत्यांची बैठक
चिंतन शिबीराचा एक भाग म्हणून काँगेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी काँगेसचे सर्व महासचिव, प्रदेश प्रभारी, प्रदेश अध्यक्ष आणि विधिमंडळ अध्यक्षांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधी रणनीतीवर चर्चा करण्यात आली. याचवेळी राजस्थानातील नेते सचिन पायलट यांनी पक्षात युवा नेत्यांचा सहभाग वाढणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या सूचनेवर पक्षात काम सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
काँगेस संघर्ष करणार
शेतकऱयांना प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँगेस एक आयोग स्थापन करणार आहे. शेतकऱयांना किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) देण्यासाठी कायदा करणे आणि जातीच्या आधारावर जनगणना करणे यासाठी संघर्ष करण्याचाही निर्धार करण्यात आला. काही दिवसांपूर्वी काँगेस नेते भूपिंदर हुड्डा यांनी शेतकऱयांसंबंधी राकेश टिकायत यांच्याशी चर्चा केली होती, असे प्रतिपादन करण्यात आले.
काम करणाऱयांना तिकीट
यापुढे पक्षात अचानक उगविणाऱया नेत्यांना तिकिटे दिली जाणार नाहीत. तर जमिनीवर काम करणाऱयांनाच ती दिली जातील, असे बजावण्यात आले आहे. संघटना पातळीवर मोठय़ा प्रमाणात बदल केले जातील. युवकांना पुढे आणले जाईल आदी अनेक बाबींवर या शिबिराच्या दुसऱया दिवशी निर्णय घेण्यात आले.









