अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स यांचे प्रतिपादन, दोन्ही देशांची प्रगती व्हावी, हीच डोनाल्ड ट्रंप यांची इच्छा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच एक व्यापक व्यापार करार होणार असून त्याची रुपरेषा सज्ज झाली आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांची एकमेकांच्या सहकार्याने प्रगती आणि उन्नती व्हावी, हीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची इच्छा आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी केले आहे. त्यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांनतर बोलताना त्यांनी भारताशी संबंध दृढ आहेत, असे स्पष्ट केले.
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापक व्यापार कराराची रुपरेषा आता निर्धारित झाली आहे. त्यामुळे पुढच्या कृती लवकरच करण्यात येतील. पुढच्या आठवड्यात भारताच्या सरकारचे प्रतिनिधीमंडळ अमेरिकेला जाणार असून तेथे करारासंबंधी पुढचा विचारविमर्श होईल. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये या कराराचा प्रथम भाग पूर्ण होऊन त्याच्या कार्यान्वयनाला प्रारंभ होऊ शकतो, अशी चर्चा आहे. दोन्ही देशांचे व्यापक हित लक्षात घेऊन हा करार होणार आहे.
21 वे शतक गाजवणार
उपाध्यक्ष व्हान्स यांनी भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांसंबंधी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची जोडी 21 वे शतक गाजविणार आहे. हे शतक मानवतेसाठी सर्वोत्तम बनविण्याचा या दोन्ही नेत्यांचा निर्धार आहे. दोन्ही नेते आपापल्या देशांच्या हिताचा विचार करतानाच एकमेकांच्या प्रगतीसाठीही काम करीत आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करार अमेरिकेसाठी नवी बाजारपेठ उघणार असून दोन्ही देशांमधील कामगार, तंत्रज्ञ, शेतकरी आणि उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण करणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक चिवट चर्चापटू असून ते नेहमी देशाच्या हिताला प्राधान्य देतात, अशीही टिप्पणी उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी यावेळी बोलताना केली.
चार क्षेत्रांमध्ये सहकार्य
आगामी काळात भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश उच्चतंत्रज्ञान, संरक्षण, व्यापार आणि ऊर्जानिर्मिती या चार महत्वाच्या क्षेत्रांमध्ये एकमेकांशी सहकार्य करुन प्रगती साधणार आहेत. या संबंधीची योजना आता सज्ज करण्यात आली आहे. दोन्ही देशांना एकमेकांची आवश्यकता असून आता आमचे संबंध अन्य कोणत्याही देशांच्या तुलनेत पाहिले जात नाहीत, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
दोन्ही नेत्यांची जवळीक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची एकमेकांशी घनिष्ट मैत्री आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधही एका वेगळ्या उंचीवर पोहचले आहेत. चर्चा करत असताना या मैत्रीमुळे मोठी सुविधा उत्पन्न होत आहे. अमेरिकेच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्र हे सर्वात महत्वाचे असले, तरी शस्त्रबळाचा उपयोग संरक्षणासाठी व्हावा. तो युद्धांसाठी होऊ नये. तसेच शांततेचे समर्थन प्रत्येकाने करावे, असेच अमेरिकेचे धोरण आहे, असेही व्हान्स यांनी जयपूरमध्ये केलेल्या एका भाषणात स्पष्ट केले. जयपूर येथे त्यानी अंबर दुर्गाला भेट दिली.
डॅड, मी भारतात राहू शकतो…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हान्स यांच्यासाठी सोमवारी रात्री भोजनाचे आयोजक केले होते. हे भोजन व्हान्स यांचा ज्येष्ठ पुत्र इव्हान हा या सुग्रास भोजनामुळे खूपच आनंदित झाल्याचे दिसून आले. मी भारतात राहू शकेन असे मला वाटते, असे त्यांना त्याचे पिता जेडी व्हान्स यांना नंतर सांगितले. हा प्रसंग स्वत: व्हान्स यांनीच नंतर पत्रकारांशी बोलताना उघड केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या अपत्यांसंबंधी खूप आस्था दाखविली, अशीही टिप्पणी त्यांनी केली.









